आंबा घाटातील गॅस टँकर अपघातानंतर बंद करण्यात आलेली वाहतूक अखेर पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून वाहनचालकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आंबा घाटात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने बुधवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली होती. या अपघातात चालक महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरमधील गॅसगळतीचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती.
अपघातग्रस्त टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल, महामार्ग विभाग तसेच संबंधित तांत्रिक पथकाने रात्रभर घटनास्थळी तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सुरक्षा उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने आंबा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोकण आणि कोल्हापूरदरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली असून अनेक तास अडचणीत सापडलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.





