PM Modi Gold Appeal : देशात सध्या लग्नसराई आणि सणासुदीचा काळ असूनही सुवर्ण बाजारपेठेत कमालीची शांतता पाहायला मिळत आहे. देशवासीयांनी पुढील एक वर्षभर कोणत्याही प्रकारची नवीन सोनं खरेदी करू नये, असं जाहीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाचा थेट आणि मोठा परिणाम आता देशातील सुवर्ण व्यवसायावर होताना दिसत आहे.
महाराष्ट्राची सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये (Jalgaon Gold Market) नवीन सोन्याची खरेदी जवळपास 70 टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांनी एक सुवर्णमध्य काढत घरातील जुने सोने मोडून (Old Gold Exchange) त्यातून नवीन दागिने बनवण्याकडे आपला कल वळवला असल्याचं चित्र बाजारपेठेत आहे.
भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सोन्याच्या खरेदीमुळे आणि आयातीमुळे (Gold Import) देशातील मौल्यवान परकीय चलन (Foreign Exchange) मोठ्या प्रमाणात परदेशात खर्ची पडत होतं. याचा थेट विपरीत परिणाम देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर आणि रुपयाच्या मूल्यावर होत असल्याचं स्पष्ट झालं. हीच बाब लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी जनतेला एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचं भावनिक आवाहन केलं होते. तसेच यासोबतच सोन्यावरील आयात शुल्कही (Import Duty) वाढवलं होतं.
पंतप्रधानांचे आवाहन आणि आयात शुल्कातील वाढ या दोन्हीचा एकत्रित परिणाम जळगावच्या प्रसिद्ध सुवर्ण व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. एरवी रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आणि ग्राहकांनी गजबजणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
सराफा व्यापाऱ्यांच्या मते, नव्याने शुद्ध सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या अचानक 50 ते 70 टक्क्यांनी खाली आली आहे. नवीन सोन्याला मागणी नसल्यानं व्यापाऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान होत असले, तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी नागरिक या आवाहनाचे पालन करत आहेत.
बाजारपेठेत एकीकडे नवीन सोन्याची खरेदी ठप्प झाली असली, तरी दुसरीकडे अनेक ग्राहकांनी कौटुंबिक सुवर्ण खरेदी पूर्ण करण्यासाठी एक नवा मार्ग शोधला आहे. लग्नकार्यासाठी लागणारे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहक आता घरातील जुनेच दागिने सराफा दुकानात आणून देत आहेत.
जळगाव बाजारपेठेत आलेल्या काही सुवर्ण ग्राहकांनी सांगितले की, देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आवाहन पूर्णपणे योग्य आहे. आम्ही त्यांच्या या आवाहनाला देशहित म्हणून सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. मात्र, घरात शुभ कार्य असल्यानं सोन्याचे दागिने अत्यंत आवश्यक आहेत. म्हणूनच आम्ही नव्याने कोणतेही सोनं न घेता, घरातील जुनं सोनं मोडून त्याचेच नवीन डिझाईनचे दागिने बनवून घेत आहोत. यामुळे आमची गरजही पूर्ण होत आहे आणि देशाचे परकीय चलनही वाचत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली.
ही बातमी वाचा: