तासभर आकाशात फक्त धुळीचे लोट : चार जिह्यांना मोठा तडाखा
वृत्तसंस्था/ झुंझुनू
राजस्थानच्या चुरू, श्रीगंगानगर, बिकानेर आणि सीकर या चार जिह्यांना शनिवारी दुपारी वाळूच्या वादळाचा तडाखा बसला. या बदललेल्या वातावरणात भरदिवसा अंधार पसरला. वाऱ्याचा वेग ताशी 60-80 किलोमीटर होता. पाकिस्तानमधून आलेल्या या वादळाचा परिणाम विशेषत: राजस्थानच्या सीमावर्ती जिह्यांवर झाला. वादळामुळे लोकांना दिवसा वाहनांचे दिवे लावावे लागले. लोकांनी घरात धावत जाऊन दरवाजे बंद करत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. आपण यापूर्वी असे वाळूचे वादळ कधीही पाहिले नव्हते, असे स्थानिकांनी सांगितले.
राजस्थानातील उदयपूरसह अनेक जिह्यांमध्ये शनिवारी सकाळी पाऊस पडला. याचदरम्यान सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सीमावर्ती जिल्हा श्री गंगानगरला धडकलेल्या वादळाने शहर धुळीने माखले. अनेक ठिकाणी वाळूच्या वादळासारखे दृश्य पाहायला मिळाले. चुरू आणि बिकानेरमध्येही अशीच दृश्ये पाहायला मिळाली. सीकर जिह्यातील फतेहपूर आणि लक्ष्मणगड परिसरही धुळीच्या ढगांनी व्यापला होता. शनिवारी दुपारी झुंझुनू आणि आसपासच्या परिसरात हवामान अचानक बदलले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काही क्षणातच संपूर्ण शहर एका विनाशकारी वाळूच्या वादळात सापडले. धुळीमुळे संपूर्ण वातावरणच बदलून गेले होते. एका शक्तिशाली आणि प्रचंड धुळीच्या वादळाने संपूर्ण आकाश झाकोळल्यामुळे काही काळासाठी रात्रीसारखे वातावरण निर्माण झाले. या जोरदार वादळामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. रस्त्यांवरील वाहने थांबल्यामुळे चालकांना हेडलाइट्स लावून प्रवास करावा लागला. धुळीचे वादळ इतके दाट होते की काही मीटर अंतरावरही पाहणे कठीण झाले होते.
हवामानातील अचानक बदलामुळे बाजारांमध्ये घबराट पसरली. धूळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यापासून वाचण्यासाठी लोक दुकानांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी धावताना दिसले. वादळादरम्यान अनेक ठिकाणी झाडे, वनस्पती आणि वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याचीही नोंद झाली आहे.