कल्ट सिनेमा – भुतं, हवेल्यांचा बी-ग्रेड कल्ट
Marathi May 31, 2026 03:26 PM

>> सोहम पिंगळीकर, [email protected]

लिंग, अॅक्शन, गूढ, भूत फार्म अशा गोष्टींचा भरणा असणारा, मुख्य प्रवाहातल्या कौटुंबिक आणि 'सुसंस्कृत' सिनेमांच्या सावलीत बेधडकपणे सभ्यतेच्या पोकळ मर्यादा मोडीत काढणारा bग्रेड सिनेमा, ज्याला एक वेगळा पंथ म्हणूनच आजही पाहिले जाते.

विस्तीर्ण जंगल, धुक्यात हरवलेली पायवाट आणि त्यातून एकटी हिंडणारी जास्मिन. एका बेवड्याची तिच्यावर नजर पडते. जास्मिन त्याला आपल्या मादक हालचालींनी जवळ बोलावते. प्रेक्षकही काहीतरी चटकदार घडणार म्हणून सावरून बसतो आणि तेवढय़ात तिच्या डोळ्यांवर लालभडक प्रकाश, भीतीदायक कर्कश संगीत, किंकाळ्या आणि रक्ताचा सडा. काय होतंय कळायच्या आधीच एवढय़ा वर्णनातूनच आपण थेट बी-ग्रेड हॉरर सिनेमांच्या जगात पोहोचतो.

आजच्या काळात ही दृश्यं जुनाट आणि विनोदी वाटत असली तरी 70-80 च्या दशकात या सिनेमांना प्रचंड मागणी होती. आधी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये शूटिंगपासून वितरणापर्यंत सगळं एकाच स्टुडिओखाली केलं जायचं. कालांतराने या स्टुडिओ सिस्टीमची जागा लहानसहान, स्वतंत्र प्रॉडक्शन कंपन्यांनी घेतली. याच काळात छोट्या शहरांमध्ये सिंगल क्रीन थिएटर्स वाढले. त्या थिएटर्सच्या मालकांना अशा छोट्या शहरांत फेमस स्टार्स आणि मोठय़ा बजेटचे हिंदी सिनेमे लावणं परवडण्यासारखं नव्हतं. पण मागणीला पुरवठा करायला त्यांना स्वस्तात आणि पटकन तयार होणाऱ्या नवनवीन चित्रपटांची गरज पडू लागली. ही गरज भागवण्यासाठी ‘बी-ग्रेड’ सिनेमा तयार करणारी एक स्वतंत्र यंत्रणा उभी राहिली.

मुख्य प्रवाहात मोठे स्टार्स, मोठं बजेट आणि ‘कौटुंबिक’ मनोरंजन असलेले ‘ए-ग्रेड’ चित्रपट होते, तर दुसरीकडे कमी पैशांत, कमी वेळात तयार केलेले, अधिकाधिक करमणूक करणारे भयपट, अॅक्शनपट आणि रहस्यपट होते. मोठ्या स्टुडिओंचे चित्रपट प्रत्येक ठिकाणी पोहोचत नसताना या रिकाम्या जागेत बी-ग्रेड सिनेमाने स्वतची स्वतंत्र जागा निर्माण केली. दोन-तीन हवेल्या, रबरचे मास्क, कृत्रिम रक्त, अनोळखी कलाकार आणि काही आठवड्यांत उभा केलेला भयपट अशी या बी-ग्रेड सिनेमाची रचना असायची. कथानकापेक्षा चाळवणूक महत्त्वाची असल्यामुळे या सिनेमांमध्ये सेक्स, अॅक्शन, रहस्य आणि भूतखेतं अशा गोष्टींचा भरणा असायचा. नव्या, अनोळखी चेहऱ्यांना घेऊन मोजक्या साधनांत आणि प्रचंड वेगाने या सिनेमांची निर्मिती केली जात असे. हिंदी सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या चौकटीत अडकलेला असताना बी-ग्रेड सिनेमा बेधडकपणे सभ्यतेच्या पोकळ मर्यादा मोडीत काढत होता. मुख्य प्रवाहातल्या कौटुंबिक आणि ‘सुसंस्कृत’ सिनेमांच्या सावलीत या सिनेमांचा वेगळा प्रेक्षकवर्ग वाढू लागला.

लाहोरच्या रामसिंघानी यांनी आपलं नाव बदलून एफ. यू. रामसे केलं आणि मुंबईत आपली फिल्म कंपनी काढली. त्यांनी बनवलेल्या ‘रुस्तम सोहराब’ला कौतुक मिळालं, तर ‘एक नन्ही मुन्नी लडकी थी’ या फिल्मने दिवाळं काढलं. पण एफ. यू. यांच्या मुलांनी एक गोष्ट हेरली – ‘नन्ही मुन्नी’मध्ये पृथ्वीराज कपूर भुतिया मास्क घालून आला की प्रेक्षक घाबरायचे. भूत दिसलं की प्रेक्षक किंचाळतात, हे लक्षात घेऊन ही भावंडं कामाला लागली. कुमारची पटकथा, कॅमेरासाठी गंगू, साऊंडवर किरण, एडिटिंगला अर्जुन, तर तुलसी आणि श्याम दिग्दर्शन असा प्रत्येक भाऊ सिनेमाची एक बाजू सांभाळायचा. फिल्म करताना त्यांच्या बायका सगळ्यांसाठी डब्बे आणायच्या म्हणून घरच्याघरी चालणाऱ्या या कौटुंबिक निर्मितीला गमतीने ‘टिफिन बॉक्स प्रॉडक्शन’ म्हटलं जायचं. ज्या काळात हिंदी फिल्म बनायला वर्षभर आणि साधारण 50 लाख रुपये लागत होते, त्या काळात या भावंडांनी तीनेक लाखांच्या बजेटमध्ये, अवघ्या काही आठवडय़ांत भयपट उभे केले. 70 ते 90 या दोन दशकांत या सात भावंडांनी मिळून ‘दो गज जमीन के नीचे’, ‘पुराना मंदिर’, ‘गेस्ट हाऊस’, ‘तहखाना’, ‘डाक बंगला’ असे तब्बल 40 सिनेमे केले. त्यांच्या या कामामुळे भारतीय हॉरर सिनेमाची स्वतंत्र संस्कृती तयार झाली.

रामसे बंधूंनी पाश्चात्य गॉथिक भयपटाची शैली वापरून तिला भारतीय रंगरूप दिलं. तळघर, धुकं, कब्रस्तान, हवेली अशी मोजकी लोकेशन्स वापरून केलेली वातावरण निर्मिती हे या सिनेमांचं वैशिष्टय़ होतं. प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी या फिल्म्सची एक खास शैली होती. त्यांचा भडकपणा, अचानक येणारं संगीत, सेक्स सीन, अतिनाटय़मय अभिनय आणि संवेदनात्मक अतिरेक, अगदी त्यांची उत्तेजक पोस्टर्ससुद्धा या शैलीचाच भाग होते. मोठय़ा शहरांपेक्षा जिथे रेल्वेसुद्धा थांबत नाही अशा छोट्या गावातल्या प्रेक्षकाला काय आवडेल, त्यानुसार रामसे बंधू आपल्या सिनेमात भर घालायचे. या सगळ्यातून भारतीय भयपटाची एक वेगळी दृश्यभाषा तयार झाली.

आज पाहिल्यावर कदाचित हे सिनेमे एकाच वेळी भीतीदायक, कामुक आणि काहीसे कृत्रिम वाटू शकतात, पण त्यांच्यातून करमणूक होणार हे मात्र नक्की. याचं सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणजे ‘वीराना.’ एका चेटकीण जास्मिन नावाच्या मुलीला झपाटते आणि तिच्या मार्फत आपला बदला घेऊ पाहते अशी थोडक्यात कथा. पण त्या कथेत भय, लैंगिक आकर्षण, विनोद आणि मेलोड्रामा यांचा अजब संगम होता. जस्मिन धुन्नाचं पात्र एकाच वेळी आकर्षक आणि धोकादायक वाटत राहतं. प्रेक्षकाला भीती वाटते, पण नजर काही हटत नाही. ‘वीराना’ आणि रामसे ब्रदर्सचे बाकी सिनेमे आजही तुम्हाला दचकवतात, चाळवतात आणि डोक्यापेक्षा थेट शरीरावर परिणाम करतात.

प्रेक्षकांना खेचून आणणाऱ्या या गोष्टींमुळे हे सिनेमे समीक्षकांना मात्र नापसंत होते. अनेकांनी या सिनेमांकडे तुच्छतेने पाहिलं. ‘भिकार’, ‘उथळ’, ‘हलक्या दर्जाचे’ असे शिक्के त्यांच्यावर मारले गेले. अगदी हे सिनेमे ‘चार आणेवाल्या’ प्रेक्षकांसाठी आहेत, असं उघडपणे म्हटलं जायचं. पण मध्यमवर्गीय अभिरुचीला अश्लील किंवा भडक वाटणाऱ्या या गोष्टी वेगळ्या वर्गातल्या प्रेक्षकांसाठी करमणुकीचं महत्त्वाचं साधन होत्या. दिवसभराच्या कंटाळवाण्या वास्तवातून बाहेर पडण्यासाठी हे सिनेमे सुटकेचा एक चटकदार पर्याय होते. रात्रीच्या वेळी एकट्याने जाऊन हे सिनेमे पाहून प्रेक्षकांना प्रस्थापित अभिरुचीविरुद्ध बंडखोरी केल्याचं समाधान मिळायचं.

1980 च्या दशकात व्हिडीओ कॅसेट संस्कृती वाढली आणि या सिनेमांना दुसरं आयुष्य मिळालं. पुढे केबल टीव्ही आणि ‘झी हॉरर शो’मुळे रामसे बंधूंची भुतं थेट घराघरांत पोहोचली. थिएटरमधून उतरलेले हे सिनेमे रात्री उशिरा टीव्हीवर, व्हिडीओ लायब्ररीत आणि पायरेटेड कॅसेट्समध्ये फिरत राहिले. चारचौघांत कोणी आपली वेगळी अभिरुची मांडायचं धारिष्टय़ करायचं नाही आणि कदाचित म्हणूनच या सिनेमांना ‘सभ्य’ सिनेमाच्या इतिहासात फारसं स्थान मिळालं नाही, पण म्हणून रामसे बंधूंना प्रेक्षक कमी पडले असं कधीही झालं नाही.

उच्च अभिरुचीचा दिखावा टाकून दिलखुलासपणे या सिनेमांचा आस्वाद घेणारी जनता आजही यूटय़ूबच्या कमेंट्समध्ये पाहायला मिळते. त्यामुळे भारतातला कल्ट सिनेमा समजून घ्यायचा असेल, तर या धुक्याने भरलेल्या हवेल्यांमधून एकदा तरी फेरफटका मारावाच लागतो.

(लेखक चित्रपट समीक्षक, अभ्यासक आहेत)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.