Ashok Saraf Funny Theatre Incident: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे चित्रपट आजही आवर्जून पाहिले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ मराठीच (Entertainment) नाही तर, हिंदी सिनेमांमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अशोक सराफ यांनी केवळ चित्रपटात काम नसून, नाटक आणि अनेक मालिकाही गाजवल्या आहेत. ते बऱ्याचदा मुलाखतीतून सिनेमा, मालिका किंवा नाटकातील (Marathi Natak) खास किस्से शेअर करत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी कोण होईल मराठी करोडपती या सुपरहिट शोमध्येही हजेरी लावली होती. हॉट सीटवर बसून त्यांनी अभिनेते आणि होस्ट सचिन खेडेकरसोबत खेळ खेळत गप्पा गोष्टी केल्या. यावेळी त्यांनी नाटकाचा एक मजेदार किस्सा शेअर केला.
अशोक सराफ यांचा प्रेमा तुझा रंग कसा, हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. या नाटकातील त्यांनी एक किस्सा शेअर केला. नाटकाच्या एन्ट्रीवेळी त्यांच्या पायजम्याची नाडी तुटली होती, त्यानंतर नेमकं काय घडलं? याचा पुढचा किस्सा त्यांनी शोमध्ये शेअर केला, अशोक सराफ म्हणाले, 'मी एन्ट्रीसाठी उभा होतो. दोन वाक्य संपली की माझी एन्ट्री होती. सदरा - पायजमा असा माझा ड्रेस होता. समोरच्याचं दोन वाक्य संपण्याआधी माझ्या पायजम्याची नाडी तुटली'.
'पायजम्याची नाडी तुटली आणि पायजमा खाली पडला. मी लगेच पायजमा उचलला. आता काय करावं मला कळत नव्हतं. मी इकडे तिकडे पाहू लागलो, आजूबाजूलाही कुणी नव्हतं. तिथे वाक्य संपत आलं होतं आणि इथे मला टेन्शन आलं होतं. माझी नजर वरती गेली. मी वर पाहिलं बाजूला एक फ्लॅट सीन होता. त्या फ्लॅट सीनवर मी एक सुंब पाहिला होता. मी सुंब घेतला आणि पायजमा बांधला. यानंतरचा सगळा पुढचा अंक मी त्यावर केला', असं अशोक सराफ म्हणाले.
'मला एक गोष्ट कळत नाहीये की, आजूबाजूला स्वच्छता असताना, फ्लॅट सीनवर सुंब नेमका कुणी ठेवला? मी तर नाही ठेवला, तो सुंब नेमका आला कुठून? त्याच वेळेला माझं लक्ष जावं, तो सुंब मला दिसावा आणि तो मी बांधावा.. अन् मी पुढचं नाटक पूर्ण करावं. जर सुंब मला मिळाला नसता तर काय झालं असतं, अगदी नामुष्कीची गोष्ट झाली होती. मला पडदा पाडावा लागला असता', असंही अशोक सराफ म्हणाले.
'आपण रंगदेवता म्हणतो ना, म्हणजे खरंच रंगदेवता आहे. आयत्या वेळेला रंगदेवता तुम्हाला विसरायलाही लावते, ब्लँकही करते, कधी वाक्यात गडबडही होते, हे सगळं ती करत असते. आपण तिच्यापुढे कुणीच नाही, हे मी त्या प्रसंगातून शिकलो', असा किस्सा शेअर करत अशोक सराफ यांनी नाटकातील आठवणींना उजाळा दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
38 वर्षीय अभिनेत्री लवकरच होणार आई; वाढदिवशीच पार पडला बेबी शॉवर, प्रेग्नन्सी ग्लोने वेधलं लक्ष