मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाचा विधान परिषद निवडणुकीसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा
GH News June 01, 2026 01:10 AM

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, उद्या विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला पहिला उमदेवार जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना विधान परिषद मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून देवयानी पाटील डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. या सर्व 17 जागा लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर, जालना विधान परिषद मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून देवयानी पाटील डोणगावकर  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. देवयानी डोणगावकर या शिवसेना ठाकरे गटाचे  जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पत्नी आहेत.  त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर, जालना विधान परिषदेसाठी आता भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना होणार आहे. परंतु संख्याबळ पहाता या मतदार संघात भाजपाचं पारडं जड दिसत आहे.

महायुतीचा फॉर्म्युला ठरला

दरम्यान दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. भाजपला सर्वाधिक 11 जागा शिवसेना शिंदे गटाला 4 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा आल्या आहेत. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गट 5 जागांसाठी आग्रही आहे. शिवसेना शिंदे गट छत्रपती संभाजीनगर किंवा जळगावच्या विधान परिषदेच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.  त्यामुळे आता जागा वाटपाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा बदलणार का? शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणार? चार की पाच? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 17 पैकी जवळपास 14 विधान परिषद मतदारसंघात भाजपाचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचं पारडं जड माण्यात येत आहे. उद्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.