अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. घरातून अभिनयक्षेत्रात काम करण्याची परवानगी नसतानाही त्यांनी धाडसी पाऊस उचलत मुंबई गाठली. करिअरच्या सुरुवातीलाच कंगना यांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन काही निर्णय घेतले. ‘गँगस्टर’ या चित्रपटाची ऑफर स्वीकारणं हा त्यापैकीच एक मोठा निर्णय होता. या पहिल्यावहिल्या चित्रपटात कंगना यांनी काही बोल्ड सीन्स दिले होते. आधीच करिअरच्या निवडीवरून आईवडिलांकडून प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी ‘गँगस्टर’सारखा निवडल्याने समस्येत आणखी भर पडली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी या चित्रपटावर त्यांच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती, याविषयीचा खुलासा केला.
आईवडिलांची प्रतिक्रियाया मुलाखतीतकंगना यांनी सांगितलं की ‘गँगस्टर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर वडिलांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तेव्हा त्यांनी आईला प्रश्न विचारला, “तुला काही समजलं का? तुला माझा चित्रपट कसा वाटला?” त्यावर त्यांची आई म्हणाली, “आपल्या समाजात तू अजूनही कमी वयाची आहेत, तरुण आहेस आणि त्यांनी चित्रपटात तुला असे सीन्स करायला भाग पाडलं.” आईची अशी प्रतिक्रिया ऐकून कंगना यांना वाईट वाटलं. “संपूर्ण चित्रपटात तू फक्त तेच सीन्स पाहिलेस का”, असा सवाल त्यांनी रागात आईला केला. आईवडिलांनी दिलेल्या अशा प्रतिक्रियेमुळे खूप वाईट वाटल्याचंही कंगना यांनी सांगितलं.
राष्ट्रीय पुरस्कारानंतर बदलले विचार“समाजातील लोक काय बोलणार, आपली मुलगी कशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये काम करतेय, याचा ते विचार करत होते. त्यानंतर मी ठरवलं की यापुढे मी माझ्या कोणत्याच चित्रपटावर आईवडिलांच्या प्रतिक्रियेची किंवा त्यांच्या रिव्ह्यूची अपेक्षा करणार नाही. कारण ते आधीही चित्रपट बघत नव्हते”, असं कंगना यांनी स्पष्ट केलं. मात्र जेव्हा कंगना यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी करिअरच्या निर्णयाचा स्वीकार करण्यास सुरुवात केली.
याविषयी कंगना पुढे म्हणाल्या, “जेव्हा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा ते खूप खुश होते. आमच्या मुलीचा राष्ट्रपतींनी सत्कार केला, या विचारानेच त्यांना खूप अभिमान वाटत होता. त्यांच्यासाठी तो खरा टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर जेव्हा मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यापेक्षाही सर्वांत मोठा क्षण त्यांच्यासाठी होता.”