Horror Movie Backrooms Earns 1121 Crore Kane Parsons: तुम्हालाही हॉरर सिनेमे (Horror Film) पाहायला आवडत असतील तर, सध्या जगभरात एक झोप उडवणारा सिनेमा ट्रेंड होतोय. या सिनेमानं रिलीजच्या फक्त तीनच दिवसांत (Backrooms Day 3 Box Office Collections) धुवांधार कमाई केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सिनेमा अवघ्या 20 वर्षांच्या दिग्दर्शकानं बनवला आहे. या सिनेमानं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, युट्यूबवरुन कारकीर्द सुरू करणाऱ्या या तरुण दिग्दर्शकानं आता थेट हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आम्ही ज्या हॉरर सिनेमाबाबत सांगतोय, त्याचं नाव Backrooms आहे. हा एक अमेरिकन सायन्स-फिक्शन सायकोलॉजिकल हॉरर सिनेमा असून त्याचं दिग्दर्शन Kane Parsons यानं केलंय. 'बॅकरूम्स' ही संकल्पना यापूर्वी इंटरनेट आणि यूट्यूबवर प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याच नावाच्या वेब सिरीजमुळे केन पार्सन्सला मोठी ओळख मिळालेली आणि आता त्यानं या कथेला फुल-लेंथ फीचर फिल्मच्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणलं आहे.
रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमानं दमदार कमाई करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर आणि सिनेप्रेमींमध्ये 'बॅकरूम्स'ची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, हॉरर प्रकारातील हा एक वेगळा आणि थरारक अनुभव असल्याचं अनेकांचं मत आहे. त्यामुळे हॉरर सिनेमांच्या चाहत्यांसाठी Backrooms सध्या 'मस्ट वॉच' ठरत आहे.
View this post on Instagram
Backrooms या सिनेमामागची कथा देखील तितकीच रंजक आहे. दिग्दर्शक Kane Parsons यांनी 2022 मध्ये 'बॅकरूम्स' ही वेब सीरिज युट्यूबवर प्रदर्शित केली होती. सीरिज अपलोड होताच ती इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाली आणि प्रेक्षकांसह अनेक मोठ्या स्टुडिओचं लक्ष वेधून घेतलं. या लोकप्रियतेनंतर विविध निर्मिती संस्थांनी पार्सन्स यांच्याशी संपर्क साधून या कथेला सिनेमाच्या रूपात सादर करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर 2023 मध्ये 'बॅकरूम्स'वर आधारित फीचर फिल्मची अधिकृत घोषणा करण्यात आली. सिनेमाचं शुटिंग 2025 मध्ये सुरू झालं आणि अखेर 29 मे 2026 रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच सिनेमाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या अनोख्या संकल्पनेचं विशेष कौतुक करण्यात आलं.
बॉक्स ऑफिसवरही 'बॅकरूम्स'नं दमदार कामगिरी केली. आकडेवारीनुसार, सिनेमानं अमेरिकन बाजारपेठेत सुमारे 774.18 कोटी रुपयांची कमाई केली, तर जागतिक स्तरावर हा आकडा तब्बल 1,121.28 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामुळे अवघ्या 20 वर्षांच्या दिग्दर्शकानं बनवलेल्या या हॉरर सिनेमानं मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडवली आहे.
ABP माझाच्या बातम्या LIVE...