दिल्लीत अग्नितांडव; 21 जणांचा होरपळून मृत्यू, जीव वाचवण्यासाठी आटापिटा, इमारतीवरून मारल्या उड्या, आग कशी लागली?
अंकिता खाणे June 03, 2026 04:13 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथील (Delhi) मालवीय नगरमध्ये भीषण आगीची (Fire) भीषण समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत आत्तापर्यंत होरपळून २१ जणांचा मृत्यू झाल्याची (Delhi Malviya Nagar Hotel Fire) माहिती समोर आली आहे. दिल्लीतील लेमन ग्रीन (Lomon green hotel) नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आज (बुधवार, ता ३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) ने घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर येथील इमारतीमधून 37 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सध्या जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेचे अनेक फोटो व्हिडीओ समोर आले आहेत.(Delhi Malviya Nagar Hotel Fire)

या आगीच्या घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीत आग वेगाने पसरल्यानंतर बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी इमारती समोरील जमिनीवर गाद्या टाकून बचावाची व्यवस्था केली. त्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनी, खिडक्या आणि इमारतीच्यावरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारल्या. दरम्यान, निवासी भागांमध्ये किती हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना व्यवसायासाठी परवाना देण्यात आला आहे, याबाबतची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडे मागवण्यात आली आहे. तसेच अशा सर्व आस्थापनांची नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(Delhi Malviya Nagar Hotel Fire)

Delhi Malviya Nagar Hotel Fire: मालवीय नगरमध्ये आग कशी लागली?

दिल्लीतील मालवीय नगर येथील रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत माहिती देताना मालवीय नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यांच्या माहितीनुसार, आग प्रथम रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात लागली आणि त्यानंतर ती शेजारील हॉटेलच्या वरच्या मजल्यांपर्यंत वेगाने पसरली. आग आणि धुरामुळे अनेक जण प्रभावित झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आपणही या बचाव मोहिमेत सहभागी असल्याचे भारती यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आगीमागील नेमके कारण आणि जबाबदार घटकांचा शोध घेण्यात यावा, असेही त्यांनी म्हटले.

Delhi Malviya Nagar Hotel Fire:  'संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी आली...' प्रत्यक्षदर्शींनी दिली माहिती

दिल्लीतील मालवीय नगर येथील भीषण अग्नितांडवाबाबत प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवासी ओम यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास आग अत्यंत भीषण स्वरूप धारण करून होती. त्या वेळी मी आणि माझा मित्र स्कूटरवरून जात होतो. तेव्हा संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढलेली दिसत होती. जीव वाचवण्यासाठी अनेकजण इमारतीच्या वेगवेगळ्या भागांतून खाली उड्या मारत होते. आम्ही स्वतः किमान पाच जणांना इमारतीवरून उड्या मारताना पाहिले असे ओम यांनी सांगितले.

या गोंधळात एका व्यक्तीचा पाय तुटल्याचेही त्यांनी नमूद केले. घटनेनंतर परिसरातील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, तर घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. "परिस्थिती अत्यंत भयावह होती. सर्वत्र धूर, आगीच्या ज्वाळा आणि नागरिकांचा आरडाओरडा सुरू होता," असेही ओम यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.