OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!
esakal June 04, 2026 02:45 AM

बंगळूर : काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते बी.के. हरिप्रसाद यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्षपदी नियुक्ती केली (Who is BK Hariprasad) आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या डी.के. शिवकुमार यांच्या जागी हरिप्रसाद यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कर्नाटकमधील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार, शिवकुमार यांना तीन वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली असून, त्यानंतर केपीसीसी अध्यक्षपदासाठी नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत बी.के. हरिप्रसाद?

बी.के. हरिप्रसाद हे सध्या कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य (एमएलसी) असून त्यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. काँग्रेसमधील अनुभवी आणि संघटनात्मक राजकारणात मजबूत पकड असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर त्यांनी सातत्याने टीका केली आहे.

Karnataka Chief Minister : कर्नाटकात अखेर सस्पेन्स संपला! हातात संविधान घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, जी. परमेश्वर बनले उपमुख्यमंत्री

हरिप्रसाद यांनी यापूर्वी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी)मध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत त्यांनी पक्ष संघटनेत मोठे योगदान दिले आहे.

बिल्लव समाजातील प्रभावी नेतृत्व

२९ जुलै १९५४ रोजी जन्मलेले हरिप्रसाद हे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील बिल्लव समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कर्नाटकातील या समाजाचा राजकीय प्रभाव लक्षणीय मानला जातो. यापूर्वी जनार्दन पुजारी आणि एस. बंगारप्पा यांसारख्या बिल्लव समाजातील नेत्यांनीही केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.

DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक लढलेली

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत हरिप्रसाद हे विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार हरिवंश नारायण सिंह यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

तसेच १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंगळूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी त्यांचा पराभव केला होता.

सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

केपीसीसी अध्यक्षपदासाठी माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे नावही आघाडीवर होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी अखेर बी.के. हरिप्रसाद यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. कर्नाटकातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्यासमोर असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.