बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. ब्रह्मपुरा भागातील प्रसाद रुग्णालय (Prasad Hospital) च्या पाचव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला (ICU) भीषण आग लागली. या दुर्घटनेत होरपळल्याने आणि धुरामुळे दम कोंडल्याने 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखलमिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच संपूर्ण वॉर्डमध्ये काळोख आणि धूर पसरला. जिल्हाधिकारी सुब्रता कुमार सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डची क्षमता १३ बेडची होती. मात्र या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच १५ रुग्ण उपचार घेत होते. शॉर्ट सर्किट होताच रुग्णालयात एकच गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली. अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कसाबसा जीव वाचवत बाहेर धाव घेतली. मात्र, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर आणि गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ही आग लागली तेव्हा रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा (Fire Fighting System) पूर्णपणे बंद होती, ज्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणता आली नाही, असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ हून अधिक गाड्या आणि पोलीस प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच वॉर्डमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढले.
या दुर्घटनेत आयसीयू वॉर्डचे प्रभारी देखील गंभीररीत्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित सर्व रुग्णांना तातडीने जवळच्या इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत सध्या ३ रुग्णांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. आयसीयूमध्ये प्रचंड धूर साचल्याने अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी भीती आहे. आम्ही घटनेचा सखोल तपास करत असून लवकरच संपूर्ण तपशील समोर येईल, असे अग्निशमन दलाचे अधिकारी राम निवास पांडे यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांमध्ये संतापया हृदयद्रावक घटनेनंतर रुग्णालयाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. खासगी रुग्णालयांमध्ये सुरक्षा मानकांचे सर्रास उल्लंघन केले जातं आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच असे निष्पाप बळी जातात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने आपण प्रशासनाला तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे म्हटले असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.