नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळी जोरात सुरू आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठ्या बंडखोरीचा (Rebellion) सामना करावा लागत आहे. अनेक जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बिघडली आहेत. अशातच आता महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी हालचालींना मोठा वेग आला असून, नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
भाजपाचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मध्यस्थीला अखेर यश आले असून, त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते (Ganesh Gite) हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, त्यांचे बंधू गोकुळ गीते (Gokul Gite) हे अजूनही निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने महायुतीपुढील डोकेदुखी पूर्णपणे संपलेली नाही.
नाशिकमधील बंडखोरी रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पडद्यामागे वेगाने चक्रे फिरत होती. कालपासून गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय निलेश बोरा (Nilesh Bora) हे मुंबईत तळ ठोकून होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मुंबईत गणेश गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांचीही भेट घेतली. या वरिष्ठ पातळीवरील बैठका आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर अखेर गणेश गीते यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
गणेश गीते हे महाजनांच्या शब्दाला मान देऊन आपला अर्ज मागे घेणार असले, तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता गणेश गीते हे स्वतः आपल्या भावाची (गोकुळ गीते) समजूत काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोकुळ गीतेंना विरोधकांनी पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या अडचणी वाढू शकतात.
गणेश गीते माघार घेणार असले, तरी गोकुळ गीते अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्यास निवडणुकीत मोठा ‘ट्विस्ट’ येऊ शकतो. आता अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत हा सस्पेन्स (Suspense) कायम राहणार असून गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेणार की निवडणूक लढवण्यावर ठाम राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
अर्ज माघारीची मुदत- 4 जून
मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
मतमोजणी- 22 जून
आणखी वाचा
आणखी वाचा