Mateen Patel | SIT चौकशीनंतर मोठा खुलासा; इम्तियाज जलीलांचं नाव का आलं?, मतीन पटेलने स्पष्टच सांगितलं
Tv9 Marathi June 04, 2026 01:45 PM

नाशिकमधील चर्चित टीसीएस लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपांमुळे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल अडचणीत आले आहेत. या प्रकरणी नाशिक एसआयटीकडून त्यांची अनेक वेळा चौकशी करण्यात आली असून नुकतीच त्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान निदा खानशी ओळख कशी झाली, ती त्यांच्या संपर्कात कशी आली आणि तिला आश्रय देण्यामागील परिस्थिती काय होती, याबाबत एसआयटीने माहिती घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मतीन पटेल यांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक दाव्यांवर स्पष्टीकरण दिले.

निदा खान ही माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप काही राजकीय नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र हा दावा फेटाळून लावत मतीन पटेल म्हणाले की, “या प्रकरणाशी इम्तियाज जलील यांचा कोणताही संबंध नाही. निदा खान ही त्यांची नातेवाईक नाही. जो कोणी असा दावा करत आहे तो चुकीची माहिती पसरवत आहे.” पटेल यांनी सांगितले की, “मला कोणतीही अडचण आली की मी माझे नेते इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधतो. या प्रकरणातही मी त्यांच्याशी बोललो होतो. मात्र त्यांनाही या संपूर्ण प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती.”

निदा खानबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “मी तिला यापूर्वी ओळखत नव्हतो. ती माझ्या कार्यालयात आली होती. तिच्या आई-वडिलांचा आणि नंतर तिचा फोन आला होता. मानवतेच्या दृष्टीने तिला काही दिवसांसाठी राहण्यासाठी खोली उपलब्ध करून दिली होती. त्या वेळी ती कोण आहे किंवा तिच्याविरोधात कोणते आरोप आहेत, याची मला माहिती नव्हती.” दरम्यान, या प्रकरणात आपण ज्यांना घर विकले होते त्यांनाही आरोपी करण्यात आल्याचा आरोप मतीन पटेल यांनी केला. संबंधित व्यक्तीचे घरही पाडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून या कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. नाशिकमधील या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून एसआयटीचा तपास सुरू आहे. पुढील चौकशीतून या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.