दादा, आम्ही वाचणार नाही, हॉटेलच्या आगीत CA च्या कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, रडायलाही कोणी शिल्लक उरलं नाही
Tv9 Marathi June 04, 2026 01:45 PM

दिल्लीत काल भीषण अग्नि दुर्घटना घडली. यात 21 निष्पाप जीवांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं. दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये हौज रानी भागात ही घटना घडली. हॉटल फ्लोरिश स्टे बी अँड बी आगीत खाक झालं. ज्या हॉटेलमध्ये ही आग भडकली. त्याच्या जवळच दिल्लीतील अनेक चांगली रुग्णालय आहेत. या रुग्णालयात उपचारासाठी येणारे लोक हॉटल फ्लोरिश स्टे बी अँड बी मध्ये थांबायचे. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असायचे. फक्त भारतातूनच नाही, तर अफगाणिस्तान, बांग्लादेशसह अन्य देशातून रुग्ण दिल्लीतील या हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी येतात. अनेक दिवस हे उपचार चालतात. म्हणून रुग्ण हॉटल फ्लोरिश स्टे बी अँड बी मध्ये थांबायचे. अशाच कमनशिबी लोकांपैकी चार्टर्ड अकाउंटट विवेक अग्रवाल सुद्धा होते. ज्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांचा या अग्नि दुर्घटनेत मृत्यू झाला.

गुरुग्राम येथे राहणाऱ्या विवेक अग्रवाल यांचं घर शोकसागरात बुडून गेलं आहे. मालवीय नगर अग्नि दुर्घटनेने त्यांचं कुटुंब उद्धवस्त केलं आहे. सेक्टर 46 मधील विवेक अग्रवाल यांच्या बंद असलेल्या घराबाहेर आसपासचे शेजारी जमले होते. विवेक अग्रवाल 48 चे तर पत्नी तरजिनी 47 वर्षांची होती. आई प्रेम लता, मुलगी जीविसा, कुटुंबातील एकूण आठ जणांना या दुर्घटनेत आपले प्राण गमावले. कोणी रडणारा सुद्धा शिल्लक उरलं नाही. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर राहणारा भाडेकरु सुद्धा काही बोलायला तयार नव्हता.

..तेव्हा विवेकचा मला फोन कॉल आलेला

योगेंद्र नावाच्या शेजाऱ्याने सांगितलं की, ‘विवेक एका खासगी कंपनीत चार्टर्ड अकाउंटेंट होते. त्यांची पत्नी NGO चालवायची’ पोस्टमार्टम नंतर मृतदेह गुरुग्राम येथे आणण्यात येतील. सगळं कुटुंब या आगीत संपलं यावर आमचा विश्वास बसत नाहीय, असं जवळच्या लोकांनी सांगितलं. विवेक एक चांगला माणूस होता. सर्व शेजाऱ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. विवेकचे एक नातेवाईक पुनीत गुप्ता यांनी सांगितलं की, “हॉटेलला आग लागली तेव्हा विवेकचा मला फोन कॉल आलेला. तो सांगत होता, दादा कदाचित आम्ही वाचणार नाही. त्यावेळी मी त्यांना रुमाल ओला करुन चेहरा झाकण्याचा सल्ला दिला होता. पण आग आणि धुराने सगळ्या कुटुंबाला संपवलं” पुनीत दिल्लीत गेले, त्यावेळी कुटुंबातील एकही सदस्य जिवंत नव्हता.

दोन खोल्या भाड्यावर घेतलेल्या

विवेकने मालवीय नगरच्या फ्लोरिश स्टे बीएंडबी हॉटेलमध्ये दोन खोल्या भाड्यावर घेतल्या होत्या. विवेकचे वडिल राधे श्याम अग्रवाल यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु होते. विवेकची मुलगी जीविसा सुद्धा एकदिवस आधी बंगळुरुहून आजोबांना भेटण्यासाठी इथे आली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.