Youtube Web Series Dhindora: सध्या सोशल मीडियावर कंटेन्ट क्रिएटर्सची (Content Creators) चलती आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण, एककाळ असा होता, जेव्हा युट्यूबर्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं. युट्यूबवर व्लॉग करुन सर्वांचं मनोरंजन करणारे अनेक युट्यूबर्स चर्चेत आलेले. असाच एक प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे, भुवन बाम (Bhuvan Bam). एकाच वेळी वेगवेगळी पात्र साकारुन व्हिडीओ करणारा भुवन बाम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला. पण, सध्या तो चर्चेत आला आहे, त्याच्या वेब सीरिजमुळे. YouTube च्या विश्वात स्वतःचं एक अद्वितीय स्थान निर्माण करणारा भुवन बाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या 'ढिंढोरा' (Dhindora) या सुपरहिट वेब सिरीजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Dhindor सिरीजचा पहिला सीझन YouTube वर प्रदर्शित झाला होता, तर 'ढिंढोरा 2' थेट Netflix वर स्ट्रीम होणार आहे. अवघ्या नऊ भागांचा समावेश असलेल्या या सीरिजच्या पहिल्या सीझननं असा एक विक्रम रचला होता, जो आजही स्मरणात राहण्यासारखा आहे. 50 कोटींहून अधिक व्ह्यूज आणि 8.8 चं प्रभावी IMDb रेटिंग मिळवत, या सीरिजनं भारतीय डिजिटल विश्वातील सर्वात यशस्वी निर्मितींपैकी एक म्हणून स्वतःचं स्थान पक्कं केलं आहे.
View this post on Instagram
YouTube पासून Netflix पर्यंतचा Dhindor चा प्रवास
Netflix नं नुकतीच आपल्या आगामी प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 'ढिंढोरा 2'चा समावेश असणं ही एक विशेष बाब ठरली आहे. या घोषणेनंतर, सोशल मीडियावर भुवन बामच्या चाहत्यांमध्ये दिसून आलेला उत्साह खरोखरंच पाहण्याजोगा होता. पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर, प्रेक्षक गेल्या काही काळापासून याच्या सीक्वेलची आतुरतेनं वाट पाहत होते. आता ही सीरिज Netflix सारख्या एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाल्यामुळे, प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
या सीरिजच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी, टीझर प्रदर्शित होताच चाहत्यांमध्ये त्याविषयी प्रचंड चर्चा सुरू झाली. आपल्या Instagram खात्यावर हा टीझर शेअर करताना, भुवन बामनं आपल्या प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनसाठी सज्ज राहण्याचा एक गमतीशीर संकेत दिला आहे.
भुवन बाम कोण आहे? (Who Is Youtube Web Series)
तसं पाहिलं तर भुवन बामला न ओळखणारं कदाचितच कुणी असेल... भुवन बाम हा भारतातील सर्वात लोकप्रिय डिजिटल क्रिएटर्सपैकी (Digital Creators) एक. त्याचा जन्म 22 जानेवारी 1994 रोजी गुजरातच्या वडोदरा इथे झाला असला, तर त्याचं बालपण दिल्लीत गेलं. सुरुवातीच्या काळात, त्याला गायक आणि संगीतकार बनण्याची इच्छा होती. त्यानं दिल्लीतील विविध रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये Live Performances देखील दिली होती. 2015 मध्ये, त्यानं 'BB Ki Vines' हे स्वतःचं YouTube चॅनेल सुरू केलं. सुरुवातीला त्याचे व्हिडीओ केवळ मर्यादित प्रेक्षकांपर्यंतच पोहोचत असले, तरी त्याची विनोदाची अनोखी शैली, उत्कृष्ट अभिनय कौशल्य आणि विविध पात्र साकारण्याची पद्धत यामुळे त्याला अल्पावधीतच प्रचंड प्रसिद्धी आणि स्टारडम प्राप्त झालं. भुवन हा त्याच्या व्हिडीओमध्ये एकाच वेळी अनेक पात्र साकारण्यासाठी विशेषत्वानं ओळखला जातो, ही त्याची प्रतिभाच त्याची सर्वात मोठी ताकद मानली जाते.
आज, त्याच्या YouTube चॅनेलचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत आणि Instagram वरही त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. डिजिटल क्षेत्रातील यशानंतर, त्याने वेब सिरीज, म्युझिक व्हिडीओ आणि अभिनय या क्षेत्रांमध्येही आपलं भक्कम स्थान निर्माण केलं आहे.
'ढिंढोरा'नं घातलेला धुमाकूळ (Dhindora Youtube Web Series)
2021 मध्ये प्रदर्शित झालेला 'ढिंढोरा' हा भुवन बामच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रोजेक्ट ठरला. या सीरिजमध्ये त्यानं विविध पात्रं साकारली, ज्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. विशेषतः 'टिटू मामा' हे पात्र प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं. या मालिकेची कथा एका सर्वसामान्य कुटुंबाभोवती गुंफलेली आहे, ज्यांच्या आयुष्यात अचानकपणे एक मोठे परिवर्तन घडतं. विनोद, भावना आणि कौटुंबिक नाट्य यांचा सुरेख संगम प्रेक्षकांच्या इतका पसंतीस उतरला की, मालिकेचा प्रत्येक भाग प्रदर्शित होताच तत्काळ 'व्हायरल' झाला.
केवळ नऊ भागांचा समावेश असलेल्या या सीरिजनं 50 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवलेत. याशिवाय, या मालिकेला IMDb वर 8.8 इतकं उत्कृष्ट रेटिंग मिळालं, जी कोणत्याही भारतीय डिजिटल प्रोजेक्टसाठी एक महत्त्वाची कामगिरी आणि मोठा टप्पा मानली जाते.
'ढिंढोरा'च्या सीझन 2 मध्ये काय खास? (Youtube Web Series Dhindor Season 2)
'ढिंढोरा 2'च्या कथानकाबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आली नसली, तरी यावेळी ही कथा अधिकच भव्य स्वरूपात सादर केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 'टिटू मामा' या पात्रानं आपल्यासाठी कोणती नवी आश्चर्य राखून ठेवली आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पहिल्या सीझनमध्ये विनोदी आणि भावनिक क्षणांचा सुरेख समतोल साधण्यात आला होता; मात्र दुसऱ्या सीझनमध्ये कथेतले अनपेक्षित ट्विस्ट आणि मनोरंजनाचा अधिकच मोठा डोस प्रेक्षकांना मिळेल, अशी अपेक्षा आहे. नेटफ्लिक्सचा भक्कम पाठिंबा लाभल्यामुळे, या मालिकेचे प्रोडक्शन आणि स्केल पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं अधिक भव्य असण्याची शक्यता आहे.
ABP माझाच्या बातम्या LIVE...