Hospital Fire In Muzaffarpur Bihar: बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आणि 20 हून होरपळले. ही घटना आज (4 जून) पहाटे तीन वाजता घडली. आयसीयूच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट आणि त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली आणि ती वेगाने पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दल रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, कर्मचारी घटनास्थळावरून गायब होते. कुटुंबीय रुग्णांना स्ट्रेचरवरून बाहेर घेऊन जाताना दिसले. आयसीयू वॉर्ड पाचव्या मजल्यावर असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्या आणि दरवाजे तोडून आयसीयू आणि इतर वॉर्डमध्ये अडकलेल्या रुग्णांची सुटका केली. मृतांपैकी चौघांची ओळख पटली असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर प्रसाद रुग्णालयातून अनेक रुग्ण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. रुग्णांचे कुटुंबीय आंदोलन करत असून त्यांच्या कुटुंबीयांना परत आणण्याची मागणी करत आहेत. मात्र, पोलीस आणि प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. या घटनेबद्दल विचारले असता आरोग्य मंत्री निशांत कुमार गप्प राहिले. राज्यसभा खासदार संजय झा हेही त्यांच्यासोबत होते. दोघेही आज दिल्लीला रवाना झाले. मात्र, एका तासानंतर निशांत यांनी अपघातावर दुःख व्यक्त केले.
प्रत्यक्षदर्शींचा आरोप आहे की, मृतांचा आकडा लपवण्यासाठी पोलिसांनी घाईघाईने घटनास्थळावरून मृतदेह हलवले. लोकांचे म्हणणे आहे की, आग लागल्यानंतर तातडीने पाणी पुरवले असते, तर मृतांचा आकडा कमी झाला असता. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 93 वर्षीय राधा देवी म्हणाल्या, "मला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. अचानक वॉर्डमधून धूर येऊ लागला. मी लगेच माझा ऑक्सिजन मास्क काढून बाहेर आले. मी बाहेर येऊन रक्षकाला आत आग लागल्याची माहिती दिली."
स्थानिक रहिवासी धीरज गिरी म्हणाले, "मी रुग्णालयाच्या छतावर झोपलो होतो. अचानक, एक मोठा किंकाळीचा आवाज आला. जेव्हा आम्ही खाली आलो, तेव्हा आम्ही लोकांना जीव वाचवण्यासाठी धडपडताना पाहिले. काहीजण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होते. वॉर्डमध्ये इतका दाट धूर होता की काहीही दिसत नव्हते."कुटुंबीयांचा असाही आरोप आहे की, आग लागल्यानंतर रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांना वेदनेत सोडून पळून गेले. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने असाही दावा केला की, जेव्हा त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा रुग्णालयाचे बहुतेक कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते.
इतर महत्वाच्या बातम्या