Team India : WTC फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूकडून निवृत्ती जाहीर, कोण आहे तो?
GH News June 04, 2026 11:10 PM

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला मोजून काही तास बाकी आहेत. उभयसंघातील कसोटी सामना हा 6 ते 10 जून दरम्यान मुल्लानपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा 32 वर्षीय विकेटकीपर फलंदाज केएस भरत याने मोठा निर्णय घेतला आहे. केएस भरत याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i) अलविदा केला आहे. केएसने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय.

केएसला टीम इंडियात निवड समितीकडून फार संधी मिळाली नाही. केएस गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर होता. त्यामुळे केएसकडून निवृत्ती जाहीर करणं अपेक्षित समजलं जात होतं. केएसने टीम इंडियासाठी विकेटकीपर म्हणून योगदान दिलं. केएसच्या कसोटी कारकीर्दीतील इंग्लंड विरुद्ध 2024 साली खेळवण्यात आलेला त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा सामना ठरला.

केएसकडून विराट आणि रोहितचे जाहीर आभार

केएसने सोशल मीडिया पोस्टद्वारे टीम इंडियाचे माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचे जाहीर आभार मानले. “या 2 दिग्गज कर्णधारांच्या नेतृत्वात खेळणं आणि त्यांच्याकडून शिकणं हा माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम अनुभव राहिला. ड्रेसिंग रुममध्ये वरिष्ठांकडून मिळालेलं समर्थन आणि त्यांचं मागर्दर्शन कायमच लक्षात राहिल”, असं म्हणत केएसने रोहित आणि विराट या दोघांचे आभार व्यक्त केले. तसेच केएसने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

“देशासाठी खेळणं हा माझा सन्मान”

मी गर्वाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर करत आहे. आपल्या देशासाठी खेळणं हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे. या प्रवासात मला फार धैर्याची आणि ताकदीची गरज भासली, मात्र मी कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र होतो. आपण एकत्र मिळवलेल्या उपलब्धीसाठी मी सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे. तुम्ही सर्वांनी मला मदत केली. तुमच्या सहकाऱ्याशिवाय माझं स्वप्न साकार करणं आणि इतके वर्ष खेळणं संभव नव्हतं”, असं म्हणत केएसने सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

श्रीकर भरतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

श्रीकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत टीम इंडियाचं एकूण 7 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. श्रीकरने या दरम्यान 20.09 च्या सरासरीने 211 धावा केल्या. श्रीकरने या दरम्यान एक अर्धशतकही झळकावता आलं नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.