ENG vs NZ : बेझ बॉलचा डब्बा गुल, Kyle Jamieson चा पंच, इंग्लंडचं 140 धावांवर पॅकअप
Tv9 Marathi June 05, 2026 02:45 AM

पाहुण्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने यजमान इंग्लंडला पहिल्या कसोटी (England vs New Zealand 1st Test) सामन्यातील पहिल्या दिवशी पहिल्या डावात 150 धावांच्या आत गुंडाळलं आहे. न्यूझीलंडने लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंडचं 39.4 ओव्हरमध्ये 140 रन्सवर पॅकअप केलं. इंग्लंडला गुंडाळण्यात कायल जेमीसन याने प्रमुख भूमिका बजावली. इंग्लंडच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. हॅरी ब्रूक याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे इंग्लंडची घरच्या मैदानात अशी वाईट स्थिती झाली. त्यामुळे न्यूझीलंडकडून कडक बॅटिंग करुन मोठी आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे न्यूझीलंड आता इंग्रजांसमोर कशी बॅटिंग करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंडची बॅटिंग आणि घसरगुंडी

न्यूझीलंडने टॉस जिंकला. कॅप्टन टॉम लॅथम याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून एमिलीयो गे याचं पदार्पण झालं. एलिस्टर कुक याने एमिलियो गे याला कॅप दिली. त्यामुळे गेकडून इंग्लंडच्या चाहत्यांना मोठी आशा होती. मात्र एमिलियोने निराशा केली. एमिलियोने 14 बॉलमध्ये 8 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर बेन डकेट आणि जेकब बेथल या दोघांनी काही वेळ इंग्लंडला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांना यात फार यश आलं नाही. बेन डकेट आणि जेकब बेथल हे दोघे झटपट आऊट झाले. डकेटने 19 आणि बेथलने 6 रन्स केल्या.

इंग्लंडचे टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे जो रुट याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र रुटनेही निराशा केली. केन विलियमसन याने रुटचा स्लिपमध्ये जबरदस्त कॅच घेतला. रुट अवघी 1 धाव करुन माघारी परतला. जेमी स्मिथ यानेही 1 रन करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कॅप्टन बेन स्टोक्स याने इंग्लंडला अनेकदा सावरलं आहे. मात्र स्टोक्स इथे अपयशी ठरला. स्टोक्स 12 धावांवर बाद झाला. गस एटकीन्सन याने 4 रन्स केल्या.

हॅरी ब्रूक याची एकाकी झुंज सुरु होती. त्यामुळे हॅरीकडून चाहत्यांना मोठी आशा होती. मात्र हॅरीला अर्धशतकानंतर फार वेळ मैदानात तग धरता आला नाही. हॅरीने 71 बॉलमध्ये 56 केल्या. ओली रॉबिन्सन 1 धाव करुन आऊट झाला. शोएब बशीर 14 धावांवर बाद होताच इंग्लंडचा डाव आटोपला. तर जोश टंग याने नाबाद 10 धावा केल्या. कायल जेमीसन याला नॅथन स्मिथ आणि विलियम ओरुर्क या दोघांनीही चांगली साथ दिली. नॅथनने 3 आणि विलियमने 2 विकेट्स मिळवल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.