संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पूर्वेतील अशोकनगर-वालधुनी येथील बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात केडीएमसी आयुक्तांना लेखी पत्र देत विविध मुद्द्यांवर तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
बुधवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य दालनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत केडीएमसी अधिकारी आणि भंतेजी गौतमरत्न महाथेरो यांची बैठक पार पडली. प्रेम ऑटो सर्कल ते विठ्ठलवाडी उड्डाणपूल प्रकल्पादरम्यान बौद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
बैठकीनंतर खासदार डॉ. शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांना खालील मागण्यांवर चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
यामध्ये विशेष चौकशी समिती (SIT) स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणे, बौद्धभूमी फाउंडेशन आणि संबंधित वादग्रस्त जमिनीच्या ७/१२ उताऱ्यांची तपासणी करणे, हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) संदर्भातील व्यवहारांची समितीमार्फत चौकशी करणे, उड्डाणपुलाच्या अलाइनमेंटचे पुनर्निरीक्षण करणे, तसेच बौद्धभूमी फाउंडेशनच्या मागण्यांची पडताळणी करणे यांचा समावेश आहे.
Kalyan-Dombivli: कल्याण-डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी, २२ मे रोजी पाणी पुरवठा राहणार बंदयाशिवाय संबंधित जागेवर विपश्यना केंद्र, शैक्षणिक केंद्र, समाजोपयोगी रुग्णालय किंवा शाळा यांसारख्या सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी डीपीआर तयार करण्याबाबत तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर जमिनीवरील आरक्षण बदलण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
तसेच, उड्डाणपूल प्रकल्पाबाबत बौद्धभूमी फाउंडेशनच्या मागणीनुसार संरक्षण भिंत आणि पोहोच रस्ता बांधण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच जमीन संपादन, नुकसानभरपाई आणि ३० मे रोजी झालेल्या कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य झाले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Kalyan : चार पदरी पुलाच्या कामावरून वाद पेटला; KDMC च्या कारवाईदरम्यान उडाला मोठा गोंधळ, नेमकं कारण काय?जनतेच्या हिताला प्राधान्य देत पारदर्शक, न्याय्य आणि वस्तुनिष्ठ चौकशी व्हावी, तसेच सर्व संबंधित बाबींची तथ्याधारित पडताळणी करून योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली.