Pimpri: विरकाचे अनधिकृत बांधकाम पाडले; पिंपरी-चिंचवड महापालिकेची धडक कारवाई
esakal June 05, 2026 12:45 PM

पिंपळे गुरव: फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील एक मुख्य आरोपी कर्नेलसिंह विरका याचे संजयनगरमधील अनधिकृत बांधकाम पिंपरी चिंचवड महापालिकेने गुरुवारी जमीनदोस्त केले. वरचा मजला आणि गच्चीवरील बांधकाम धडक कारवाईत पाडण्यात आले.अतिक्रमण निर्मूलन विभागाने ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहकार्याने ही कारवाई केली. विरकाला बुधवारी (ता. ३) नोटीस बजावण्यात आली होती. त्याने सुमारे ८७५ चौरस फूट जागेवर आलिशान घर बांधले होते. तो तळमजल्यावर राहायचा.

एका मद्यपीने दिलेल्या माहितीनुसार वरच्या मजल्यावर अवैध दारू विक्री, जुगार अड्डा आणि गांजा सेवनासाठी व्यवस्था होती. तेथे ग्राहक ‘रिझला’ व ‘गो-गो’ पेपरचा वापर करून गांजा ओढायचे. गच्चीवर त्याने गावठी दारू पिण्यासाठी बाकडे, टेबल-खुर्च्या टाकून बारसारखी व्यवस्था केली होती. घराच्या आतील बाजूने लोखंडी जिन्याने गच्चीवर जाण्याची सोय होती. अलीकडे निर्ढावेलेला विरका एकाच ठिकाणी दारू, जुगार आणि अमली पदार्थांचा गैरव्यवहार करायचा.

Tukaram Mundhe : आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अण्णा बोधडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कारवाई केली. यात कार्यकारी अभियंता उमेश मोने, उपअभियंते संदीप पाडवी, महेंद्र देवरे, प्रशांत कोतकर, सुनील दांगडे, सुनील हरिदास, कनिष्ठ अभियंता सतीश डांगे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. कारवाईसाठी चार ब्रेकर, दोन गॅस कटर, ४० मजूर आणि २० जवान वापरण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस आयुक्त विजयकुमार चौबे यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी १० अधिकारी आणि ५० पोलीस अंमलदारांच्या बंदोबस्तात कारवाई सुरळीत पार पडली.

Poha Idli Recipe: पोह्यांपासूनही इडली बनते हे माहिती आहे का? चव अशी की पुन्हा पुन्हा बनवाल

"महापालिकेच्या जागेवर अथवा झोपडपट्टी क्षेत्रात कोणतेही अनधिकृत बांधकाम करणे नियमबाह्य आहे. अशी बांधकामे सुरू केल्यास अथवा उभारल्यास कायद्यानुसार निष्कासन कारवाई करण्यात येईल. शहरातील पुनर्वसन प्रक्रिया आणि नियोजित विकासाला बाधा आणणाऱ्या कोणत्याही अनधिकृत संरचनेबाबत महापालिका कठोर भूमिका घेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम करू नये. सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे."

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

"या संदर्भात कर्नेलसिंह विरकाच्या घराची कोणतीही नोंद महापालिकेकडे उपलब्ध नसल्याने बांधकाम अनधिकृत ठरते. कारवाईपूर्वी २४ तास नोटीस दिली होती. त्यानंतर कारवाई केली."

- अण्णा बोधडे, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.