Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रानौत यांच्या अडचणी वाढल्या, 'भारत भाग्य विधाता'चित्रपटावर कोणाचा आक्षेप ?
Tv9 Marathi June 05, 2026 12:45 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत या गेल्या काही काळापासून त्यांच्या आगामी’भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहतेदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच हा चित्रपट वादात सापडू शकतो. कारण काहींनी या चित्रपटातील संवाद, दृश्यांवर आक्षेप घेतला आहे.

कंगान राणौत यांच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. मात्र या ट्रेलरमध्ये आक्षेपार्ह संवाद असल्याने नर्स संघटनेने चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. 26/11 हल्ल्यातील मुंबईतील कामा रुग्णालयातील प्रसंगावर हा चित्रपट आहे. मात्र या चित्रपटातील संवादावरून आक्षेप घेत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीण्यात आलं आहे.

नर्सेस फेडरेशनचं मुख्यमंत्र्यांना पत्र

‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट येत्या 12 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 26/11 रोजी मुंबईवर झालेला हल्ला आणि कामा हॉस्पिटलमधील प्रसंग, त्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही संवाद आणि दृश्यांमुळे नर्सेसच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे, असा आरोप आरोप करत महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने मुख्यमंत्री यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.

काय आहेत मागण्या ?

परिचारिका (नर्स) व्यवसाय हा आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आणि सन्माननीय घटक आहे. अशा परिस्थितीत नर्सेसची अवमानकारक, उपहासात्मक किंवा चुकीची प्रतिमा दर्शवणारे संवाद व दृश्ये समाजामध्ये चुकीचा संदेश देऊ शकतात, असं महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचं म्हणणं आहे. तसेच हजारो परिचारिकांच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे नर्सेसविषयी आक्षेपार्ह, बदनामीकारक किंवा दिशाभूल करणारे संवाद तसेच काही दृश्ये हटवावीत किंवा त्यामध्ये आवश्यक बदल करावेत, अशी मागणी फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.

तसेच चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी तो परिचारिका संघटनांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात यावा आणि त्यांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा अशी मागणीही नर्स फेडरेशनने केली आहे. यावर कंगना रानौत आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचं काय म्हणणं आहे, त्यांची बाजू काय हे अद्याप समोर आलेलं नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.