Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Tv9 Marathi June 05, 2026 03:45 PM

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील घडामोडींनी नवे वळण घेतले आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या निर्णयानंतर आता बाळ माने यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बाळ माने मुंबईत दाखल झाले असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. निवडणूक लढवून अपेक्षित मतसंख्या मिळाली नसती, तर पक्षाची आणि स्वतःची मोठी राजकीय नामुष्की झाली असती. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात घोडेबाजाराला थारा न देता आपण एक सकारात्मक संदेश दिल्याचा दावा देखील त्यांनी केला.

यावेळी बाळ माने यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. विनायक राऊत हे पक्षातील कार्यकर्त्यांना चुकीची माहिती देतात तसेच शिंदे गटातील काही नेत्यांशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षातून हकालपट्टी करण्यापूर्वी कोणतीही कारणे विचारली गेली नाहीत किंवा नोटीसही देण्यात आली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, माझ्यावर आर्थिक व्यवहारांचे आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत. तसे झाले तर मी राजकारणातून संन्यास घेण्यास तयार आहे, असे खुले आव्हानही बाळ माने यांनी दिले. त्यांच्या या आरोपांमुळे कोकणातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.