टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी रिटायरमेंट पॉलिसी! बीसीसीआयने आखली अशी रणनिती, जाणून घ्या
GH News June 05, 2026 07:12 PM

BCCI Apex Council Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आता खेळाडूंच्या भविष्यासाठी पॉलिसी तयार करण्याची योजना आखत आहे. कारण गेल्या काही दिवसात खेळाडूंनी अचानक निवृत्ती घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यानंतर विदेशी टी20 लीग खेळण्याला प्राधान्य देत आहेत. विदेशी लीग स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू एक रणनितीचा अवलंब करत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा करत आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यावर गंभीररित्या चर्चा झाली. बीसीसीआयच्या नियमानुसार, कोणताही सक्रिय भारतीय क्रिकेटपटून आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत किंवा आयपीएल स्पर्धेचा भाग असेल तर त्याला विदेशी टी20 किंवा फ्रेंचायझी लीग खेळण्याची परवानगी नाही. पण भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यास त्यांना विदेशी लीग स्पर्धेत खेळण्याची सधी मिळते.

बीसीसीआयच्या या नियमातील पळवाट शोधून अनेक खेळाडू निवृत्ती घेत विदेशी संघांसोबत करार करत आहेत. रिपोर्टनुसार, खेळाडूंनी विदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी शोधलेली पळवाट रोखण्यासाठी बीसीसीआय बैठकीत एक कूलिंग ऑफ पीरियड आणण्याचा विचार सुरू झाला आहे. चर्चेनुसार, एखादा भारतीय खेळाडू निवृत्तीनंतर थेट विदेशी लीग खेळायला जात असेल तर त्याला भारतीय क्रिकेट सिस्टममध्ये परतण्यासाठी कमीत कमी 5 वर्षांची बंदी घातली जाईल. म्हणजेच पाच वर्षे भारतीय क्रिकेटमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे आता पळवाट शोधून विदेशी लीग खेळणं खेळाडूंना अडचणीचं ठरू शकते.

बीसीसीआयच्या मते, देशातील अनुभवी खेळाडूंनी जास्तीत जास्त वेळ भारतीय क्रिकेटला आणि आयपीएलची प्रतिष्ठा जपण्यासाठी द्यावा. पण आता बीसीसीआय हा नियम कधी लागू करणार आणि कसा लागू होणार यावर क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. काही खेळाडूंना देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये हवी तशी संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसतो, अशा स्थितीत खेळाडूंना कशी संधी देणार हे देखील महत्त्वाचं आहे. दरम्यान, बीसीसीआय बैठकीनंतर या चर्चेवर अखेरचा शिक्कामोर्तब आणि कायदेशीर पैलूंचा विचार करण्याची जबाबदारी बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांकडे सोपवण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.