मोठी बातमी! महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांना प्रस्ताव, राजकारणात मोठी खळबळ
Tv9 Marathi June 05, 2026 09:45 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गुरुवारी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या गोटात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. त्यावरून आता मविआत नाराजीनाट्य सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली, त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. दरम्यान ज्या -ज्या उमेदवारांनी अशाप्रकारे निवडणुकीतून माघार घेतली, त्यांच्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून कारवाई करण्यात आली आहे, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान पुणे विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता नाराजीनाट्य सुरू झालं आहे.  पुणे विधान परिषदेमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाने माघार घेतल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट नाराज झाला आहे. पुण्यात मविआतून बाहेर पडण्याचा वरिष्ठांकडे प्रस्ताव दिल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं नुकसान झाल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले वसंत मोरे?

संजय राऊत यांच्यासोबत बैठक झाली होती. ही बैठक बाळासाहेब ठाकरे कलादालनात झाली होती. त्या बैठकीमध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की, जर महाविकास आघाडी नसती तर पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती चांगली असती. म्हणजे एक प्रकारे महाविकास आघाडीकडून पुणे शहरात शिवसेना ठाकरे गटाचं नुकसान झालं आहे. मी असंही म्हणालो की, दुसरीकडे काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु पण्यातून तरी कमीत -कमी बाहेर पडा. पुण्यातून जर आपण मविआमधून बाहेर पडलो तर आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करता येईल, असं यावेळी वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.