Trinamool Congress: तृणमूल काँग्रेसच्या एका महत्त्वपूर्ण सभेत, ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. बंडखोर आमदारांचा विरोध असूनही, ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली. ममता बॅनर्जी टीएमसीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कायम राहतील. इतकेच नव्हे तर, बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देण्याच्या बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय टीएमसीने घेतला आहे. टीएमसी या निर्णयाला कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी एक बैठक झाली, ज्यात मोजक्याच नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष अनेक राजकीय आव्हानांना तोंड देत आहे. अशा वातावरणात सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. ममता यांच्या निवासस्थानी आलेल्यांमध्ये माजी आमदार चंद्रिमा भट्टाचार्य, राज्यसभा खासदार डोला सेन, स्वरूपनगरच्या आमदार बिना मंडल, लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी आणि माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांचा समावेश होता. अनेक टीएमसी बंडखोरांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उघडपणे आक्षेप घेतला होता. अशा परिस्थितीत, ममता बॅनर्जी अभिषेकवर कोणती कारवाई करतील, याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती.
यापूर्वी, बुधवारी टीएमसीने पक्षाच्या सर्व समित्या आणि संलग्न संघटना बरखास्त केल्या होत्या. शुक्रवारच्या बैठकीत पक्षाच्या सर्व समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून, अभिषेक बॅनर्जी यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे, हे पद त्यांनी यापूर्वीही भूषवले होते. टीएमसी नेते डेरेक ओ'ब्रायन आणि डोला सेन यांची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही नेते अभिषेक बॅनर्जी यांना साहाय्य करतील. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाचा एक प्रमुख चेहरा असलेल्या सायनी घोष यांची टीएमसी युवा शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही त्या या पदावर होत्या. माला रॉय यांची महिला टीएमसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रिमा भट्टाचार्य यांची पश्चिम बंगाल टीएमसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बंगाल विधानसभेत टीएमसीच्या बंडखोर गटाचे नेते ऋतब्रता बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला टीएमसीने विरोध केला आहे. पक्षाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर असून आम्ही तो स्वीकारत नाही. आम्ही सोमवारी कलकत्ता उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध अपील करणार आहोत. ते पुढे म्हणाले, "भाजप ज्या प्रकारे टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या करत आहे आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे, त्याविरोधात आम्ही लढू. आम्ही रस्त्यावर उतरून लढू, आम्ही न्यायालयात लढू."
कल्याण बॅनर्जी म्हणाले, "त्या 59 आमदारांनी आधी लोकांकडे जाऊन त्यांची परवानगी घेतली पाहिजे. ममता बॅनर्जी या मुख्य व्यक्ती आहेत. त्या आमदारांना काहीही महत्त्व नाही. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी आपापल्या मतदारसंघात जावे, कार्यकर्त्यांना भेटावे आणि त्यांची परवानगी घ्यावी की ममता बॅनर्जी या त्यांच्या नेत्या नाहीत. मी त्यांना आव्हान देतो." टीएमसीने असेही म्हटले आहे की, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी इंडिया ब्लॉकच्या बैठकीला उपस्थित राहतील.
इतर महत्वाच्या बातम्या