मुंबईत पाणीटंचाईचं सावट! रविवारपासून खासगी पाणी टँकर सेवा बंद करणार, मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा मोठा निर्णय
इशान देशमुख June 05, 2026 11:13 PM

मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा पाणी संकटाचे सावट निर्माण झाले आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून केंद्रीय भूजल प्राधिकरण (CGWA) नियमांच्या अंमलबजावणीमुळे टँकर व्यवसाय अडचणीत आल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढला नाही तर रविवारी रात्री 12 वाजल्यापासून मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

प्रक्रियात्मक अटी प्रत्यक्षात पूर्ण करणे टँकर चालक आणि विहीर मालकांसाठी अत्यंत कठीण

असोसिएशनचे प्रतिनिधी जसबीर सिंह बिरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात बृहन्मुंबई महापालिका (BMC) आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून CGWA नियमांचे पालन करण्याबाबत नोटिसा देण्यात आल्याचे म्हटले आहे. भूजल उपसा नियंत्रित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले असले, तरी काही नियम आणि प्रक्रियात्मक अटी प्रत्यक्षात पूर्ण करणे टँकर चालक आणि विहीर मालकांसाठी अत्यंत कठीण असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टँकर सेवा बंद झाल्यास मुंबईतील हजारो नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसणार

पत्रात मुख्यमंत्री कार्यालयासोबत तातडीची बैठक आयोजित करण्याची आणि परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असलेली कारवाई स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. काही विहीर मालकांचे वीज जोडणी खंडित करण्यात आल्याचा आरोपही असोसिएशनने केला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणारी संपूर्ण खासगी टँकर व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या काळात खासगी टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो. गृहनिर्माण संस्था, झोपडपट्ट्या, बांधकाम प्रकल्प आणि व्यावसायिक आस्थापना मोठ्या प्रमाणावर टँकरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रविवारी मध्यरात्रीपासून टँकर सेवा बंद झाल्यास मुंबईतील हजारो नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.

टँकर संघटनांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का? मुंबईकरांचं लागलं लक्ष?

दरम्यान, सरकार आणि प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते आणि टँकर संघटनांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत सेवा बंद ठेवण्याच्या भूमिकेवर असोसिएशन ठाम असल्याने शहरासमोर मोठे पाणी संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mumbai Water Shortage: मुंबईवर पाणीसंकट, धरणांमध्ये फक्त 40 दिवसांचा साठा शिल्लक; सात धरणांतील जलसाठा 14 टक्क्यांवर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.