Domestic Violence सतत मारहाण, केस उपटले, जेवणही नीट नाही, विवाहितेला १० महिने शौचालयात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड
Marathi June 05, 2026 11:25 PM

असं म्हटलं जातं की माणूस आपल्या घरी सर्वात सुरक्षित असतो. पण डेहराडूनमधील एका ३२ वर्षीय विवाहितेला याउलट अनुभव आला आहे. या महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी शौचालयात डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना संस्कार आणि मूल्यांचे धडे देणाऱ्या या व्यक्तीवरच पत्नीचा अमानुष छळ केल्याचा आरोप आहे.

पीडित महिलेचे वडील सैन्यात तब्बल ३३ वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले हवालदार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मुलीशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या मनात संशय निर्माण झाला होता. प्रत्येक वेळी सासरकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात होती. फोनवर बोलण्याची संधी दिली जात नव्हती. अखेर त्यांनी थेट मुलीच्या सासरी धडक मारली. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नजरेसमोर जे दृश्य आले, ते पाहून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. अंधाऱ्या आणि दुर्गंधीयुक्त जागेत त्यांची मुलगी जिवंत प्रेतासारखी पडून होती. २०२४ मध्ये मोठ्या थाटामाटात हा विवाह पार पडला होता. वर सुशिक्षित, सरकारी नोकरीत आणि कुटुंब प्रतिष्ठित असल्याने मुलीच्या पालकांनी कोणतीही शंका घेतली नव्हती.

लग्नानंतर त्रास सुरु

मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच परिस्थिती बदलू लागली. किरकोळ कारणांवरून टोमणे, अपमान आणि मानसिक छळ सुरू झाला. सासूच्या वागण्यात दिवसेंदिवस क्रूरता वाढत गेली. घरातील प्रत्येक गोष्टीसाठी सुनेलाच जबाबदार धरले जाऊ लागले. पीडित महिला सुरुवातीला सर्व काही सहन करत राहिली. कदाचित परिस्थिती सुधारेल, अशी तिला आशा होती. पण आणखी भयानक काळ वाट पाहत होता.

फेब्रुवारी २०२५ मध्ये महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. पण याच क्षणापासून तिच्या आयुष्यातील काळ्या अध्यायाला सुरुवात झाली. सासरच्यांनी जन्मताच नवजात बालकांना आईपासून वेगळे केले. एवढेच नव्हे तर तिला स्वतःच्या मुलांना अंगावरचे दूध पाजण्याची परवानगीदेखील दिली नाही. आई आणि मुलांमधील नात्याची अशी निर्दयीपणे केलेली ताटातूट तिच्यासाठी मानसिक छळाची सुरुवात ठरली.

पतीकडून वारंवार मारहाण

तपासातील माहितीनुसार, दिल्लीहून घरी येणारा पती आणि सासू-सासरे तिला वारंवार मारहाण करत होते. काठ्या, पाईप आणि बाटल्यांनी तिच्यावर हल्ले केले जात होते. प्रत्येक मारहाणीनंतर तिच्या शरीरावर नवीन जखमा उमटत होत्या. तिचे केस ओढून उपटल्याने डोक्यावर गंभीर जखमा झाल्या. याहूनही धक्कादायक आरोप म्हणजे सासऱ्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला धमकावल्याचा आहे.

जुलै २०२५ पासून परिस्थिती आणखी भयानक झाली. महिलेला घरातील एका खोलीत आणि अनेकदा शौचालयात डांबून ठेवण्यात येऊ लागले. दिवस, आठवडे आणि महिने उलटत गेले. बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तोडण्यात आला. खिडकीतून येणारा प्रकाश आणि बंद दरवाजाबाहेरील आवाज एवढेच तिचे जग उरले होते. तिला दिले जाणारे अन्नही शिक्षा असल्यासारखे होते. दिवसेंदिवस केवळ भात, कांदा, मिरची आणि मीठ यावर त्या महिलेची गुजराण चालली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.