Mumbai Goa National Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयी व विविध समस्यांबाबत माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी 20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या तसेच स्थानिक नागरिक व प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे हुसेन दलवाई यांनी लक्ष वेधले. सदर निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे उर्वरित रखडलेले काम येत्या 20 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम 2011 पासून, म्हणजेच गेल्या 15 वर्षांपासून रखडत सुरु आहे. या प्रदीर्घ कालावधीत अनेक बड्या कंत्राटदार कंपन्या बदलण्यात आल्या परंतु महामार्गाचे भाग्य बदलू शकलेले नाही. सद्यस्थितीचा विचार केला तर, एकट्या रायगड जिल्ह्यातील 140 किलोमीटरच्या टप्प्यांपैकी केवळ 70 टक्के काम पूर्ण होऊ शकले आहे, तर तब्बल 30 टक्के काम अजूनही प्रलंबित आहे.
महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) खारपाडा येथे पहिला टोल नाका (Toll Plaza) सुरू केला आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या टोल वसुलीला ‘प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेली लूट’ म्हणून संबोधले आहे. “जेव्हा रस्ताच पूर्णपणे सुरक्षित आणि तयार नाही, तर मग टोल कोणत्या गोष्टीचा वसूल केला जात आहे?” असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत. स्थानिक स्तरावर या टोल नाक्याला तीव्र विरोध होत असूनही प्रशासनाने टोल वसुली थांबवलेली नाही. आता जून महिना सुरू झाला असून मान्सून अगदी तोंडावर आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि स्थानिक रहिवाशांना पुन्हा एकदा खड्डेमय आणि धोकादायक रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार अशी भीती सतावत आहे. “दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते, पण प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही सुधारणा दिसत नाही,” असा आरोप कोकणवासियांनी केला आहे.