पुणे - शेअर बाजारात जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची ७१ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत, धनकवडी येथील ३६ वर्षीय फिर्यादी यांच्या वडिलांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. ग्रुप ॲडमिन दीपा रासीमाने हिने पाठवलेल्या लिंकवरून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर ६२ लाख ७० हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम न मिळाल्याने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
दुसऱ्या घटनेत, कात्रज येथील २९ वर्षीय तरुणास टेलिग्रामवर शेअर ट्रेडिंगची जाहिरात पाठवून जाळ्यात ओढण्यात आले. आरोपींनी चव्हाण यांचे ओळखपत्र व्हॉट्सॲपवर मागवून त्यांचे एक ‘इंटरनल इक्विटी अकाउंट’ उघडले. याद्वारे त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर नउ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. कोणताही परतावा न मिळाल्याने चव्हाण यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.