पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमूल कांग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या पक्षात हाहाकार उडालेला आहेय शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या आमदार आणि खासदाराच्या बैठकीला केवळ आठ आमदार आणि सहा खासदारच उपस्थित राहिल्याने पक्षात गोंधळ उडाला आहे. गेल्या वेळी झालेल्या आमदारांच्या बैठकीला केवळ २० आमदार पोहचले होते. या वेळी आकडा आणखीनच कमी झाला आहे. टीएमसीच्या ८० पैकी ५८ आमदारांनी बंडखोरी करत नवा विधीमंडळ नेता निवडला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील घरात टीएमसीच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत आलेल्या आमदारात बीना मंडल, आशिमा पात्रा, मदन मित्रा, कुणाल घोष, फिरहाद हकीम, शोभनदेब चट्टोपाध्याय, बिमान बनर्जी, अशोक कुमार देब यांचा समावेश आहे.तर खासदारांमध्ये डोला सेन, माला रॉय, कल्याण बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओ’ब्रायन, सुदीप बंद्योपाध्याय यांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीएमसीमध्ये लोकसभा खासदारात मोठी फूट पाहायला मिळू शकते. एकूण २९ लोकसभा खासदारांपैकी २३ खासदार बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. आणि येणाऱ्या काळात आणखी मोठी फूट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश आकडा २२ आहे. तसेच राज्यसभेतील खासदारांचा विचार केला तर येथे या पक्षाकडे १३ खासदार आहेत.
तृणमूलला १९९८ मध्ये स्थापन झाल्यानंतर गेल्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसपासून वेगळे होत ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेसची स्थापना केली होती. तृणमुल काँग्रसेच्या अंतर्गत हे संकट केवळ सत्तेतून बाहेर होण्याचे नव्हे तर नेतृत्वाच्या एकछत्री सत्तेच्या विरोधात आहे. नाराज झालेले बंडखोर आमदार आताही ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारत असले तरी ममता यांचा भाचा आणि राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या अभिषेक बॅनर्जी यांचा खुला विरोध करत आहेत.
पक्षाचे वरिष्ठ खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांनी म्हटले आहे की लोक ममता बॅनर्जीची साथ जे सोडत आहेत, त्यांचे राजकीय अस्तित्व त्यांच्या शिवाय नाही. पार्टीचे वरिष्ठ राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी शंका व्यक्त केली आहे की हा असंतोषाचा भडका पुढे जाऊन संसदेपर्यंत पसरु शकतो. मात्र, पार्टीच्या नेतृत्वाचा दावा आहे की सध्या खासदारांमध्ये कोणत्याही संघटीत बंडखोरीचे संकेत नाहीत. परंतू तरीही चिंता व्यक्त केली जात आहे की विधानसभेचे हे संकट लोकसभा आणि राज्यसभेपर्यंतही जाऊ शकते.
ममता यांचा आमदारांना रोखण्याचा प्रयत्नतृणमुल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या २८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा पडलेल्या फूटीनंतर पक्षातून पळणाऱ्या आमदारांना रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या व्यक्तीगत रुपाने सर्व बंडखोर आमदारांशी संपर्क करत आहेत. तर पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते आमदारांना एकजूट करण्याच्या मागे लागले आहेत. ममता यांनी गेल्या दोन दिवसात हावडा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर येथील अनेक आमदारांशी संपर्क साधला आहे. ज्यातील अनेकांनी रीताब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांच्या बैठकीत भाग घेतला होता.