IND vs AFG: कसोटी सामन्यावर पावसाचं सावट! खेळपट्टी आणि प्लेइंग 11 बाबत जाणून घ्या
GH News June 06, 2026 01:11 AM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात कसोटी सामना 6 जूनपासून सुरू होत आहे. दोन्ही संघात दुसऱ्यांदा कसोटी सामना होणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये दोन्ही संघ भिडले होते आणि भारताने सामना जिंकला होता. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 262 धावांनी पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा हे संघ भिडणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेचा भाग नाही. त्यामुळे हा एक औपचारिक सामना आहे असं म्हंटलं तरी चालेल. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. त्यात सामन्यादरम्यान हवामान कसं असेल आणि खेळपट्टी कोणाला मदत करणार? हे जाणून घेऊयात..

खेळपट्टी कशी असणार आहे?

न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना मदत करणारी असेल. कारण ही खेळपट्टी काळ्या मातीने बनवलेली आहे. त्यामुळे सामन्याच्या सुरूवातीला गोलंदाजांना उसळी मिळेल. त्यामुळे पहिल्या डावात वर्चस्व घेण्याची संधी मिळेल. त्यानंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होईल. पण दोन तीन दिवसांचा खेळ संपला तर खेळपट्टी संथ होईल आणि फिरकीला मदत करेल.

पावसामुळे सामन्यात व्यत्यय येईल का?

जून महिना सुरू झाला आणि पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मुल्लानपूर येथे कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता आहे. दुपारी तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. तर आर्द्रता 32 टक्के राहण्याची शक्यता आहे. सकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पण दिवस जसा पुढे जाईल तसं हवामानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळचे काही तास वगळता दिवसभर पावसाची कोणतीही चिन्हे नाहीत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेट कीपर), देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे/मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगयाल खरोथाई, कैस अहमद, बिलाल सामी, सलीम साफी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.