मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट 
एबीपी माझा वेब टीम June 06, 2026 09:43 AM

Oil India Discovers Natural Gas Reserves Andaman Sea : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर इंधन टंचाईचं भयावह संकट उभं राहिल्याचे चित्र होतं. असे असताना ऊर्जा सुरक्षा दिशेने भारताला मोठा जॅकपॉट लागला आहे. अंदमानच्या समुद्रात नैसर्गिक वायूचा महाप्रचंड साठा (Natural Gas Reserves Andaman Sea) सापडला आहे. आता भारताला मोठा वायू साठा सापडल्यामुळे भारत इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भतेच्या दिशेने वाटलाच करु शकतो. अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा महत्त्वपूर्ण शोध लागला असून भारताच्या ऊर्जा सुरक्षा दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे. (Gas Discovery in India)

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केली महत्त्वाची घोषणा (Gas Discovery in India)

ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) ने अंदमान समुद्रात नैसर्गिक गॅसचा नवा शोध लावला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. हा शोध भारताच्या खोल समुद्री (Deepwater) संशोधन मोहिमेला नवी दिशा देईल. यापूर्वी 2025 मध्ये श्री विजयापुरम-2 विहिरीतही गॅसचा शोध लागला होता. त्यात 87 टक्के मिथेन (Methane) आढळला होता, जो व्यावसायिकदृष्ट्या उच्च दर्जाचा मानला जातो. या दोन्ही विहिरींमधील यशस्वी शोधांमुळे अंदमान बेसिनला ‘ऊर्जेचे महासागर’ म्हणून ओळखले जात आहे. हे संशोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समुद्र मंथन मिशन (Samudra Manthan Mission) अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश खोल समुद्री भागातील खनिज आणि ऊर्जा संसाधनांचा शोध घेणे हा आहे.

Gas Discovery in India: ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ऊर्जा सुरक्षा धोरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा

दरम्यान, भारत सध्या नैसर्गिक गॅसचा मोठा आयातदार देश आहे. या नव्या शोधामुळे देशांतर्गत उत्पादन वाढवून आयातीवर अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल. सरकारचा उद्देश 2030 पर्यंत ऊर्जा मिश्रणात गॅसचे प्रमाण 15 टक्क्यांपर्यंत वाढवणे आहे (सध्या सुमारे 6-7 टक्के आहे). अंदमान समुद्रात अंदाजे 371 मिलियन टन हायड्रोकार्बन संसाधने असू शकतात, असे अंदाज आहेत. मात्र, व्यावसायिक उत्पादनासाठी अजून चाचण्या आणि पायाभूत सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. याबाबत बोलताना मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले, “अंदमान बेसिनमध्ये हायड्रोकार्बनचा शोध हे दीर्घकाळापासूनचे विश्वासाचे पुष्टीकरण आहे. म्यानमार ते इंडोनेशियापर्यंतच्या क्षेत्रात सापडलेल्या शोधांशी हे सुसंगत आहे.” हा शोध अजून प्राथमिक टप्प्यात आहे. पूर्ण व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यास काही वर्षे लागू शकतात. तरीही, हा भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ऊर्जा सुरक्षा धोरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.