Team India : आयर्लंड-इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यर कर्णधार, वैभव सूर्यवंशीची एन्ट्री
GH News June 06, 2026 04:11 PM

टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी आणि त्यानंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दोन्ही दौऱ्यांत टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि सचिव देवजित सैकीया या दोघांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. या दरम्यान सैकीया यांनी आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला. दोन्ही संघांविरुद्ध टीम इंडियाच्या त्याच 16 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

श्रेयस अय्यर टी 20i कर्णधारपदी

टीम इंडियात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा सूर्यकुमार यादव याला टी 20i कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं आहे. तर त्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याची भारतीय संघाच्या टी 20i कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तसेच तिलक वर्मा याला उपकर्णधार करण्यात आलं आहे. तसेच सूर्याला दोन्ही टी 20i मालिकेसाठी भारतीय संघात स्थानही देण्यात आलेलं नाही.

वैभव सूर्यवंशी याला संधी

निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी टीम इंडियात 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा समावेश केला आहे. वैभवने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली होती. तसेच काही नव्या नावांचाही समावेश आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि वैभव सूर्यवंशी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.