Petrol Diesel Price Hike: मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारी कंपन्यांना नफा झाला असेल असे मानले जात होते. पण हा दावा फोल ठरला. सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात इंधन पुन्हा महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये पुन्हा 5 रुपयांची वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. कच्चा तेलाच्या किंमती भडकल्याने आणि पश्चिम आशियातील संकटामुळे तेल कंपन्यांना प्रत्येक दिवशी जवळपास
610 कोटींचा तोटा होत असल्याचा दावा आहे.
ICRA लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समूह सहसंस्थापक प्रशांत वशिष्ठ यांच्या माहितीनुसार 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एकूण जवळपास 7.5 रुपये प्रति लिटरची दरवाढ करण्यात आली होती. या दरवाढीनंतरही सरकारी तेल कंपन्यांना OMCs पेट्रोलवर जवळपास 5.5 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 4.5 रुपये प्रति लिटरचे नुकसान होत आहे. तीनही सरकारी कंपन्यांची आकडेवारी तपासता या कंपन्यांना प्रत्येक दिवशी जवळपास 610 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जवळपास 5 रुपये प्रति लिटरची वाढ होण्याची शक्यता वशिष्ठ यांनी व्यक्त केली.
तर अजून भडकतील किंमती
इंधन तोटाच नाही तर ICRA च्या अंदाजानुसार, एलपीजीवर जवळपास 680 रुपये प्रति सिलेंडरचा तोटा सहन करावा लागत आहे. तर एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील (ATF) नुकसान जवळपास 93 कोटी रुपये प्रतिदिन इते आहे. क्रिसिल रेटिंग्सच्या विश्लेषणानुसार, जर कच्चा तेलाचे भाव असेच वाढत राहिले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 10 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
कच्चा तेलाच्या किंमती वाढणार की कमी होणार?
सध्या कच्चा तेलाचा पुरवठा, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, कच्चा तेलाच्या आयातीचा वाढलेला खर्च आणि इराण-अमेरिकेतील वाढता तणाव यामुळे जागतिक बाजारात इंधनाच्या किंमती भडकल्या आहेत. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांचा नफा आणि तोट्याचे गणित बिघडले आहे. तर त्याचा फटका थेट ग्राहकांच्या खिशावर होत आहे. ग्राहकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात कच्चा तेलाच्या किंमती साधारणपणे 112 डॉलर प्रति बॅरलवर आहेत. या किंमती भडकण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते, इराण सोबतचा करार अंतिम टप्प्यात आहे. इस्त्रायलने आगळीक केली नाही. तर कच्चा तेलाच्या किंमती झरझर खाली येतील. पण सध्या तरी मध्य-पूर्वेतील संघर्षाला विराम मिळालेला नाही.होर्मूझ समुद्रधुनी आणि लेबनॉनवरील हल्ले हे कळीचे मुद्दे ठरले आहेत.