आरबीआय कडून रेपो रेट जैसे थे,कोणती बँक कमी व्याजावर गृहकर्ज देतेय? जाणून घ्या
जगदीश ढोले June 06, 2026 09:13 PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीची बैठक काल पार पडली. तीन दिवसांच्या बैठकीनंतर काल आरबीआयकडून रेपो रेट जाहीर करण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी रेपो रेट 5.25 टक्के कायम ठेवला. रेपो रेट कायम ठेवल्यानं सध्या गृहकर्ज किंवा इतर कर्जांच्या व्याज दरात बदल  झालेला नाही. रेपो रेटमध्ये सध्या वाढ करण्यात आलेली नाही मात्र आगामी काळात रेपो रेट वाढल्यास गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे. येत्याकाळात क्रूड ऑईलच्या दरातील वाढ, अलनिनोचा मान्सूनवरील परिणाम,  कमी पावसामुळं वाढणारी महागाई याचा परिणाम म्हणून रेपो रेट वाढल्यास गृहकर्ज महाग होऊ शकतं.  

घर खरेदी करण्यासाठी ज्यांना गृहकर्ज घ्यायचं आहे ते सध्याच्या व्याजदरावर कर्ज घेऊ शकतात. फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध सुरु होण्यापूर्वी रेपो रेटमध्ये कपात होऊ शकते असा अंदाज होता.  महागाई नियंत्रणात आल्यानंतर आरबीआयकडून वाढीला वेग देण्यासाठी रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटसची कपात केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम आणि इतर कारणांमुळं महागाई वाढण्याचं संकट निर्माण झालं आहे.यामुळं आगामी काळात रेपो रेट वाढवला जाऊ शकतो असा अंदाज आहे. रेपो रेट वाढल्यास गृहकर्जाच्या व्याज दरात मोठी वाढ होऊ शकते.   

गृहकर्जाचा व्याज दर किती?

साधारणपणे गृहकर्ज 15 ते 20 वर्ष कालावाधीसाठी घेतलं जातं. त्यामुळं गृहकर्ज घेताना बँकांच्या व्याज दरासंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. व्याज दरातील छोटा फरक देखील परिणाम कारक ठरतो, कारण गृहकर्जाचा कालावधी दीर्घ असतो. व्याज दर कमी असल्यास गृहकर्जाचा हप्ता कमी बसतो. तर, अधिक व्याज दर असल्यास ईएमआय अधिक द्यावा लागतो. 20 वर्षांसाठी कर्ज असेल तर 240 हप्ते भरावे लागतात. मात्र, ईएमआयमध्ये थोडा फरक देखील 20 वर्षातील परतफेडीच्या रकमेवर होऊ शकतो.  

स्टेट बँक ऑफ इंडिया : 7.25 ते 9.05 टक्के 
बँक ऑफ बडोदा :  7.20 ते 9.25 टक्के 
यूनियन बँक ऑफ इंडिया : 7.15 ते 9.6 टक्के
सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 7.10 ते 9.15 टक्के 
कॅनरा बँक : 7.25  टक्के ते 10 टक्के
बँक ऑफ इंडिया : 7.10 ते 10.25 टक्के
इंडियन ओवरसीज बँक : पगारदारांसाठी 7.10 टक्क्यांपासून सुरु, बिगर पगारदारांसाठी  8.2 टक्के 
आयसीआयसीआय बँक : 7.5 टक्क्यांपासून सुरु 
Axis Bank :  8 टक्के ते 11.9 टक्क्यांपर्यंत 

दरम्यान, बँका गृहकर्ज देताना कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, त्याचं उत्पन्न यासर्वांचा विचार करुन व्याज दर निश्चित करतात. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.