Loni Kalbhor Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; स्वतः नातेवाइकाला फोन करून दिली कबुली
esakal June 07, 2026 03:45 AM

लोणी काळभोर - चारित्र्याच्या संशय घेऊन, अमानुषपणे हल्ला करून तिच्या डोक्यात दगड घालत पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील हनुमान मंदिर परिसरात गुरुवार (४ जून) मध्यरात्री घडली आहे. विशेष म्हणजे, पत्नीला गंभीर जखमी केल्यानंतर पतीने स्वतःच नातेवाइकाला फोन करून 'मी तिला ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड घातला,' अशी कबुली दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत शितल शरद वारे (वय ३४) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी गोरख वारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद विठ्ठल वारे (वय ३७, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद वारे याला दारूचे व्यसन असून तो वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होते. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तो दारूच्या नशेत पत्नीशी भांडत होता. त्यावेळी तो पत्नीला शिवीगाळ करत 'आज तुला मारून टाकतो,' अशी धमकी देत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शरदने पत्नीच्या मोबाईलवरून त्याचा चुलत भाऊ गोरख संजय वारे याला फोन केला. 'माझे आणि शितलचे खूप भांडण झाले. मी तिच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले आहे,' असे सांगून त्याने फोन कट केला.

यानंतर गोरख वारे आणि जखमी महिलेची बहीण छाया वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हनुमान मंदिरासमोरील परिसरात रक्ताचे डाग दिसून आल्याने त्यांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर त्यांनी विश्वराज रुग्णालयात चौकशी केली असता, जखमी महिलेला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजले. ससून रुग्णालयात पोहोचल्यावर शितल वारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि त्या बेशुद्ध अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नीविरुद्ध पत्नीच्या खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.