पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली आणि राज्याच्या मतदारांनी भाजपाच्या हातात राज्याची सूत्रे दिली. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला. अनेक नेत्यांवर हल्ले झाले. यात ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक बॅनर्जी यांचीही सुटका झाली नाही. TMC चे नेते खा.आनंद बॅनर्जी यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता बंगालमधल्या दोन घटनांनी देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
लोकांचा संताप
निवडणूकीनंतर झालेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध जनतेचा संताप सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. हावडा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी एक टीएमसी नेता साड्यांच्या ढिगाऱ्यात लपलेला आढळला, तर दुसऱ्या एका नेत्याची गावकऱ्यांनी चपलांचा हार घालून गावातून धिंड काढली. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
गृहनिर्माण घोटाळा
हावडाच्या उदयनारायणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिलासपूर परिसरात पोलीस स्थानिक टीएमसी नेते ब्रह्मानंद चक्रवर्ती यांच्या शोधात दाखल झाले. स्थानिकांनी त्यांच्यावर सरकारी गृहनिर्माण योजनेतून ‘कट मनी’ घेऊन खंडणी उकळल्याचा आरोप केला होता. जेव्हा पोलीस त्यांना पकडण्यासाठी पोहोचले, तेव्हा ते एका कपड्यांच्या दुकानाच्या स्टोअररूममध्ये साड्यांच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली लपले.
झडतीदरम्यान पोलिसांना संशय आला आणि त्यांनी साड्यांचे गठ्ठे ताब्यात घेतले. त्यानंतर ब्रह्मानंद चक्रवर्ती यांना बाहेर काढून अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय हिंसाचाराशी संबंधित आरोपांप्रकरणीही त्यांची चौकशी सुरू आहे.
TMC नेत्याची गाढवावरून धिंड
हावडा जिल्ह्यातीलच अमरदाहा गावात, गावकऱ्यांनी तृणमूल काँग्रेसचे आणखी एक नेते, संन्यासी मन्ना यांच्या विरोधात उघडपणे आपला संताप व्यक्त केला आहे. सरकारी योजनांअंतर्गत लाभ देण्याच्या नावाखाली त्यांनी गरीब लोकांकडून पैसे उकळल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यांच्या घरातून आधार कार्ड आणि मनरेगा जॉब कार्ड जप्त केल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. पैसे दिल्याशिवाय या योजनांअंतर्गत लाभ मिळत नसल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. याच संतापाचे पर्यावसन मन्ना यांची धिंड काढण्यात झाले.
निषेध म्हणून गावकऱ्यांनी संन्यासी मन्ना यांचे मुंडण केले, त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्यांना गावातून धिंड काढली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये लोकांचा मोठा जमाव घोषणाबाजी करताना दिसत आहे. असे असले तरी या व्हिडिओची स्वतंत्रपणे पडताळणी करता आली नाही. या घटनेनंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपी नेत्याला जमावातून सोडवून सुरक्षित ठिकाणी नेले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
पश्चिम बंगालमध्ये स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचार, लाचखोरी आणि सरकारी योजनांमधील अनियमिततेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांविरोधात जनतेचा संताप उघडपणे उफाळून येत आहे. विरोधी पक्षाने टीएमसी नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचार आणि खंडणीखोरीचे आरोप केले आहेत. या घटनांमुळे आता राज्याच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, वाढत्या जनक्षोभाचा भविष्यात बंगालच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.