ज्याने इराकला FIFA World Cup पर्यंत पोहचवलं, त्यालाच अमेरिकेने विमानतळावर ७ तास रोखलं! फोटोग्राफर तर देशात नो-एन्ट्री
esakal June 07, 2026 10:45 PM

FIFA World Cup 2026 Iraq: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात होत असून ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेस्किको येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी इराकनेही पात्रता मिळवली आहे. त्यामुळे इराकचा संघातील अनेक खेळाडू नुकतेच अमेरिकेत पोहचले असून त्यांच्या एका खेळाडूला ७ तास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती इराकी क्रीडा अधिकाऱ्याने दिली आहे.

वडील भारताकडून खेळू शकले नाहीत, पण पोरगा आता FIFA World Cup खेळणार! कोण आहे तो जाणून घ्या

इराकचा स्ट्रायकर आयमन हुसैन संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याच्याच गोलने इराकला ४० वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवून दिली होती. मात्र शनिवारी सकाळी त्याला शिकागोमधील ओ'हारे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आडवण्यात आले होते.

त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची तब्बल ७ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. मात्र, इराकच्या राष्ट्रीय संघाचे फोटोग्राफर तलाल सलाह यांनाही ताब्यात घेतल्यानंतर तब्बल १० तासांच्या चौकशीनंतर अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आहे.

या चौकशीदरम्यान हुसैनच्या फोनचीही तपासणी करण्यात आल्याचे इराकी ऑलिम्पिक समितीसोबत काम करणाऱ्या आणि राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या संपर्कात असलेल्या अधिकाऱ्याने उघड केले. तसेच अधिकाऱ्याने माहिती दिली की 'इराक राष्ट्रीय संघाचे फोटोग्राफर तलाल सलाह यांना १० तासांपेक्षा अधिक काळ ताब्यात घेतलेलं, त्यांच्याही फोनची तपासणी झाली आणि नंतर त्यांना अमेरिकेत परवानगी नाकारण्यात आली.

सध्या याबाबत इराकी फुटबॉल असोसिएशनने यावर उत्तर दिलेले नाही. तसेच अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीकडूनही कोणतेही भाष्य यावर करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे फिफा वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी आता आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना या घटना घडलेल्या स्पर्धेला वादाची किनार लाभली आहे. याशिवाय सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे त्याचे पडसाद या स्पर्धेवरही उमटणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

FIFA World Cup: पलंगाखालील खोक्यात लपवला होता विश्वकरंडक! 1950 फुटबॉल विश्वचषकातील थरारक सत्यकथा

फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये इराकचा पहिल्या फेरीतील सामन्यांसाठी आय ग्रुपमध्ये समावेश आहे. या गटात त्यांच्यासह फ्रान्स, सेनेगल आणि नॉर्वे या देशांचे संघ आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.