छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
निलेश बुधावले, एबीपी माझा June 08, 2026 02:13 AM

Chhagan Bhujbal: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली आहे. राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत. या जागेसाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. तसेच नवनीत राणा यांचीही चर्चा रंगली होती. छगन भुजबळ यांनी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत भुजबळ यांनी मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ (Sameer Bhujbal)  यांना मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही फडणवीसांकडे तसा आग्रह केला होता. 

समीर भुजबळ यांना मंत्री करण्यात येणार नाही, भाजपचा निरोप

त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीत नेत्यांशी चर्चा करुन यांसदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली होती. आज (7 जून) उशिरा फडणवीस यांच्याकडून समीर भुजबळ यांना मंत्री करण्यात येणार नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माहिती देण्यात आली. समीर भुजबळ यांना मंत्रीपदी वर्णी लागत नसल्यामुळे भुजबळ यांनी दिल्लीला जाण्यास नापसंती दर्शवली. भुजबळांच्या नापसंतीनंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दुसरीकडे, उद्या (8 जून) सकाळी साडे दहा वाजता विधानभवनात जैन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यात येणार आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असतानाच भाजपच्या नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा रंगल्याने भूवया उंचावल्या होत्या. मात्र, अखेर पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या पारड्यात वजन टाकण्यात आले. राजेंद्र जैन प्रफुल पटेल यांचे विश्वासू शिलेदार ते एकेकाळी त्यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. 

कोण आहेत राजेंद्र जैन?

राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला. विधान परिषद सदस्य (माजी आमदार): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षकार्याची दखल घेत त्यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर पाठवले होते. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार परिणय फुके यांच्याकडून पराभव झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.