15 वर्षांच्या चमत्काराला पालकांची ढाल, वैभवसोबत आई-वडीलही दौऱ्यावर; बीसीसीआयचा निर्णय
Marathi June 08, 2026 11:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी क्रिकेटचा नवा ‘वंडर बॉय’ ठरलेला 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आता इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत झळकणार आहे. मात्र या दौऱ्यात केवळ वैभवच नाही, तर त्याचे आई-वडीलही संघासोबत प्रवास करणार आहेत. बीसीसीआयने घेतलेला हा विशेष निर्णय सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

सामान्यतः हिंदुस्थानी संघाच्या अधिकृत दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या पालकांना संघासोबत राहण्याची परवानगी दिली जात नाही. यापूर्वी काही कालावधीसाठी खेळाडूंच्या पत्नी किंवा मैत्रिणींना संघासोबत राहण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र एखाद्या खेळाडूच्या आई-वडिलांना अधिकृतरीत्या संघासोबत प्रवासाची परवानगी देण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. वैभव अल्पवयीन असून प्रथमच वरिष्ठ राष्ट्रीय संघाचा भाग बनत असल्यामुळे बीसीसीआयने हा अपवाद केला आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, वरिष्ठ खेळाडूंनी भरलेल्या संघाच्या वातावरणात वैभवला सहज जुळवून घेता यावे आणि त्याला मानसिक आधार मिळावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. वैभवचे पालक इच्छुक असतील तर बोर्ड त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वैभवसमोर आता इतिहास रचण्याची संधी आहे. इंग्लंड दौऱ्यात पदार्पणाची संधी मिळाल्यास तो हिंदुस्थानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरू शकतो. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 16 वर्षे 207 दिवसांच्या वयात पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी वैभवच्या निवडीचे समर्थन करताना त्याच्या प्रतिभेवर शिक्कामोर्तब केले. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना त्याने अनेक अनुभवी गोलंदाजांचा समाचार घेतला आणि प्ले-ऑफच्या शर्यतीत संघाला जवळपास एकहाती लढवले. आता हिंदुस्थानी क्रिकेटचा हा उदयोन्मुख तारा पहिल्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघाला आहे; फरक एवढाच की या स्वप्नांच्या उड्डाणात त्याच्यासोबत आई-वडिलांची सावलीही असणार आहे. त्यामुळे वैभवचा हा दौरा केवळ क्रिकेटचा नाही, तर एका कुटुंबाच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.