आयपीएल 2026 स्पर्धा खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल तर राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने… त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच काय तर या स्पर्धेत धावांचा डोंगर रचला. त्याने आक्रमक फलंदाजी करताना दिग्गज फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यामुळे त्याची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने घेतली. त्याची क्षमता पाहूनच निवड समितीने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय टी20 संघात निवड केली आहे. त्याच्या या यशानंतर क्रिकेटविश्वात त्याच्याबाबत चर्चा होत आहे. हा खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. असं असताना वैभव सूर्यवंशीने याबाबतचं मौन सोडलं आहे आणि कसोटी क्रिकेटबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.
वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सचे अधिकृत सोशल मिडिया चॅनेलवर संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर यांना सांगितलं की त्याची आक्रमक फलंदाजी या फॉर्मेटच्या हिशेबाने आहे. त्याला टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, ‘अनेक लोक मला विचारत आहेत आणि चर्चा करत आहेत की मला भविष्यात लाल चेंडूचे क्रिकेट खेळायचे आहे का? माझे साधे उत्तर आहे की मी लाल चेंडूने आधीच खूप सराव केला आहे आणि तो करत राहीन. मी बिहारसाठीही खूप लाल चेंडूचे क्रिकेट खेळलो आहे आणि पुढेही खेळत राहीन.’
वैभव सूर्यवंशी म्हणाला की, ‘मला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे कारण मी त्यासाठी कठोर सराव करतो. टी20 मधील माझी खेळण्याची शैली तशी आहे कारण त्या फॉरमॅटची ती गरज आहे. जेव्हा मी लाल चेंडूचे क्रिकेट खेळतो, तेव्हा मी त्या फॉरमॅटच्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार माझ्या फलंदाजीत बदल करतो. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे हे माझे स्वप्न आहे. बाकी सर्व देवाच्या हातात आहे.’ वैभव सूर्यवंशीने आता टी20 संघात एन्ट्री घेतली आहे. त्याचं वय पाहता त्याच्याकडे क्रिकेटसाठी अजून बराच कालावधी आहे. 15व्या वर्षी टीम इंडियात त्याने एन्ट्री घेतली आहे. लवकरच त्याच्यासाठी वनडे आणि कसोटीसाठी दारं खुली होतील यात काही शंका नाही. वैभवने वयाच्या 12व्या वर्षी बिहारकडून रणजी ट्रॉफी खेळताना इतिहासातील सर्वात तरुण पदार्पण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक बनला होता.