फुलंब्री - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील पाथरी परिसरात सख्या चुलत भावानेच तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
राजू रामू बनसोड असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे पंधरा दिवसांपूर्वी राजू बनसोड याला त्याच्या चुलत भावाने फोन करून बोलावले होते. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह पाथरी परिसरातील जंगलात फेकून देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेनंतर आरोपीने मृत राजूच्या मोबाईलचा वापर करून त्याच्या खात्यातील पैशांवर डल्ला मारला. तसेच मोबाईलवरील फोन-पे सुविधेचा वापर करून आर्थिक व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर राजू बेपत्ता असल्याचे भासवण्यासाठी आरोपीने स्वतःच छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, बेपत्ता झाल्यानंतरही राजूच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबीयांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आली. या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, आर्थिक व्यवहार आणि कॉल डिटेल्सची पडताळणी केल्यानंतर संशयाची सुई चुलत भावाकडे वळली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला. ठसेतज्ज्ञ आणि अन्य तांत्रिक पथकेही घटनास्थळी दाखल झाली होती. जंगल परिसरातून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
या घटनेमागील नेमके कारण, आर्थिक व्यवहारांचा वाद की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या हत्येचा संपूर्ण तपास सुरू आहे.