Nagoba Mandir : भाटघरने गाठला तळ; पांडवकालीन नागोबा मंदिर पाण्याबाहेर
esakal June 10, 2026 03:45 AM

महुडे - भाटघर धरणातील पाणीसाठा मंगळवारी (ता. ९) ८.०९ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भोर तालुक्यातील जुन्या वेळवंड गावठाणातील पांडवकालीन नागोबाचे मंदिर पाण्याबाहेर आले आहे. पाणी पातळी खालावल्याने या पुरातन मंदिरासह गावच्या जुन्या खुणा पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत.

ब्रिटीशकालीन भाटघर धरणाच्या निर्मितीवेळी वेळवंडी नदीकाठची ४० गावे विस्थापित झाली होती. यामध्ये वेळवंड गावचाही समावेश होता. वर्षभरातील सुमारे १० महिने पाण्याखाली असणारे हे नागोबा मंदिर आता पूर्णपणे उघड्यावर आले आहे.

दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरासमोर पार्वती मातेची मूर्ती आणि नंदी असून, पाणी ओसरताच ग्रामस्थांनी गाभाऱ्यातील गाळ काढून मंदिराची स्वच्छता केली आहे. सध्या हे पौराणिक मंदिर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची पावले वेळवंडकडे वळत आहेत.

वारसा जतन करण्याची गरज

धरण क्षेत्रात पाणी कमी झाल्यावर आजही जुन्या घरांच्या वेशी, वाडे आणि मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. हा प्राचीन सांस्कृतिक वारसा जतन करण्याची गरज स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.