'ती डिप्रेशनमध्ये होती, 10 दिवसांपूर्वीच तिला भेटलेले, ऑडिशन संपल्यावर...'; संचिता उगलेच्या मैत्रिणीनं काय-काय सांगितलं?
abp majha web team June 15, 2026 06:13 PM

Sanchita Ugle Ends Life: छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugle) हिनं वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीने चाहते हादरले असून लोकप्रियतेच्या शिखरावर असताना  संचिताने आयुष्याचा दोर का कापला? ही नेमकी आत्महत्याचं आहे की घातपात आहे?  असे अनेक सवाल उपस्थित होत असताना, संचिताची मैत्रीण आणि सहअभिनेत्री मेघा  शर्माने (Megha Sharma) अत्यंत महत्वाचा खुलासा केलाय. 'मनीकंट्रोल' ला दिलेल्या माहितीनुसार, संचिता काही काळापासून नैराश्यातून जात होती. ती अनेकदा आत्महत्येबद्दल बोलायची. तिची अनेक वैयक्तिक कारणे होती, त्यासाठी तिच्यावर उपचार सुरु असल्याचही अभिनेत्री मेघा शर्माने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले आपले आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपाऱ्यातील परिसरात राहत होती. घरी एकटी असतानाच संचितानं टोकाचं पाऊल उचललं. संचितानं राहत्या घरात साडीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, अभिनेत्री मेघा शर्माच्या खुलाशाने या प्रकरणात पोलिसांना नवी दिशा मिळणार आहे.

Megha Sharma: काय म्हणाली अभिनेत्री मेघा शर्मा?

मेघा शर्मा म्हणाली," मला खूप मोठा धक्का बसला आहे, मला काय बोलू हे सुचत नाही. तिने गळफास लावून घेतला, असे मी ऐकले. ती जानेवारीपासून डिप्रेशनच्या समस्येशी झुंजत होती. तिच्या आयुष्यात काही वैयक्तिक समस्या होत्या आणि ती त्यासाठी वैयक्तिक उपचार घेत होती. मात्र, ती आनंदाने जगणारी व्यक्ती होती. मी दहा दिवसांपूर्वी तिला भेटले होते, तिला एका ऑडिशनला घेऊन गेले होते. त्या ऑडिशननंतर तिला हा रोल मिळेल, हा विश्वास होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिचा फोन स्वीच ऑफ होता, असे मेघा शर्मा यांनी सांगितले.

ती अनेकदा आयुष्य संपवायची किंवा जीव द्यायची भाषा करायची. तिची आई आणि आम्ही सगळे संचिताला सकारात्मक राहायला सांगायचो, तू नकारात्मक गोष्टींबद्दल विचार करु नकोस, असेही तिला आम्ही अनेकदा सांगितले होते. मात्र, यावेळी आम्ही तिला वाचवू शकलो नाही, असेही मेघा शर्मा यांनी सांगितले.

Sanchita Sharma Death:नेमकी घटना काय?

मनोरंजनसृष्टीतून आज एक धक्कादायक बातमी समोर आली. कुमकुम भाग्य आणि वागळे की दुनिया यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री संचिता उगलेने  १५ जून रोजी सकाळी मुंबईतील नालासोपारा येथील तिच्या घरी आत्महत्या केली. तिने छताच्या पंख्याला गळफास लावून आयुष्याचा दोर कापला. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपासाला सुरुवात केलीय. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. 

संचिता उगलेच्या अभिनयातील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. झी टीव्हीच्या लोकप्रिय मालिका "कुमकुम भाग्य" मध्ये दिया टंडनची भूमिका साकारल्यानंतर तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे संचिताच्या अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला नव्या उंचीवर नेले. त्यानंतर तिने  विकी कौशलच्या छावा चित्रपटात ताराराणी यांची भूमिका साकारली.या प्रकरणी तपास सुरू असल्याने या अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.

: TV Actress Sanchita Ugale End Life: हिंदी मालिकाविश्वात नाव कमावणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.