डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
कुठलीही गोष्ट करताना त्यामागची धारणा, विचार महत्त्वाचा. त्याप्रमाणे सुट्टीतील आनंद मिळवून देणाऱ्या ॲक्टिव्हिटीचे नियोजन करताना मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास योग्य अर्थानं होण्याची सुरुवात करण्याचा हाच सुवर्णकाळ आहे. आणि या विकासाच्या संदर्भात करायच्या गोष्टी पुढे वर्षभर सुरू हव्यात.
सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे आणि चंगळवादाचंही आहे. तांत्रिक प्रगतीबरोबर येणारे सारे मोह इथे आहेत. या काळात यशस्वी व्हायचं आहे आणि मोहमयी वातावरणात विवेकानं मनावर ताबाही ठेवायचा आहे. अशा या स्पर्धेच्या युगात म्हणूनच ताणतणाव अपरिहार्य आहेत. त्यांना तोंड देण्याची क्षमता निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. आसपास निर्माण होत राहणाऱ्या मोहाच्या, चंगळवादी गोष्टी खरंच आपल्याला सुख देऊ शकतात का याचं विश्लेषण करता यायला हवं. ‘चकाकते ते सगळे सोने नसते’ हे जाणवायला हवं. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. आपला व्यक्तिमत्त्व विकास असा व्हायला हवा की त्यात कुठल्याही तणावाच्या परिस्थितीत मन शांत, स्थिर, कणखर आणि आनंदी असायला हवं. मनाची अशी जडणघडण बनवणं आता शक्य आहे. म्हणजेच मनाचं ‘सकारात्मक नियोजन’ बऱ्याच अंशी शक्य आहे. त्यासाठी आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या युगात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या संज्ञेकडे खूप वेगळ्या अर्थाने पहायला हवे. व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत शांत, स्वस्थ, आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर आणि विवेकी व्यक्तिमत्त्व बनणं हे जास्त महत्त्वाचं. आयुष्यातील चढ-उतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता मिळवणं महत्त्वाचं. असं व्यक्तिमत्त्व विशिष्ट प्रयत्नांनी मिळवता येतं. एकाग्रता, सकारात्मक विचार यामुळे ते जमू शकतं. मनाच्या व्यायामशाळेसाठी निर्माण केलेल्या काही व्यायामांनी हे साध्य होऊ शकतं. अगदी कुणालाही. या व्यायामाचं उद्दिष्ट काय असावं? तर दोन दिशांनी व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं. एक दिशा बाहेरच्या जगात यशस्वी होण्यासाठीची तंत्रे, व्यायाम शिकवणारी तर दुसरी आंतरिक स्वस्थतेसाठीची साधना शिकवणारी. म्हणजेच आतलं विश्व शांत, स्वस्थ आणि आनंदी बनवणारी. हे जमलं की मग खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास झाला असं म्हणता येईल. सुट्टीतील उपक्रम या सर्वांची सुरवात करून देऊ शकतात. त्यासाठी आवश्यक ती स्वयंशिस्त आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होण्यासाठी पालक, शिक्षक आणि तज्ज्ञ एकत्र येऊन योजना आखू शकतात.
परंतु हे सगळे उपक्रम व्हायला हवेत मात्र मजेत, हसत खेळत. त्यातील सुट्टीचे वातावरण जपून. आमच्या घराच्या मागच्या बाजूला झाडं आहेत बरीच. तिथे बऱ्याच वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे छोटे-मोठे पक्षी, खारी, वगैरे बागडताना दिसतात. छान आवाजात किलबिल सुरू असते. खारींचा पाठलागाचा खेळ, पक्ष्यांचा लहान पक्ष्यांना भरवण्याचा उपक्रम. पिलांचं धडपडणं, पुन्हा उभं रहाणं, सावरणं, पुन्हा नव्यानं उडणं किंवा पळणं असे सगळे उद्योग सकाळच्या जादुई प्रकाशात सुरू असतात. मला अनेकदा वाटतं की ही पिलंसुद्धा नव्यानं काही ना काही तरी शिकतायत. तेही खूप आनंदात. वाटतं त्यांचीही उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे.