ओबीसी कॉलम नसल्यानं जनगणनेला विरोध, लाखनी नगरपंचायतने थेट बजावली नोटीस, भंडारा जिल्ह्यात प्रशासनानं बजावलेल्या पहिल्याच नोटीसनं ओबीसींमध्ये तीव्र नाराजी
प्रशांत देसाई June 10, 2026 11:13 AM

Bhandara News : ओबीसींची जनगणना (India Census 2027) करण्याचं काम आता सुरू झालेल आहे. मात्र, ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यानं अनेक ठिकाणी या जनगणनेला विरोध होत आहे. भंडाऱ्याच्या (Bhandara)लाखनी येथील उमेश सिंगनजुडे यांनी जनगणनेसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यानं त्यांच्या घरी आलेल्या प्रगणकांना जनगणनेसाठी (Census 2027) आवश्यक माहिती दिली नाही. परिणामी, या प्रगणकांना सिंगनजुडे यांच्या घरून परत जावं लागलं. याप्रकरणी लाखनी नगरपंचायतनं उमेश सिंगनजुडे यांना जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 8 आणि 11 अन्वये जनगणनेला विरोध दर्शवून शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जनगणनेला विरोध केल्याच्या प्रकरणात प्रशासनानं बजावलेली ही भंडारा जिल्ह्यातील बहुदा राज्यातील पहिलीच नोटीस असल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Bhandara : ओबीसींचा कॉलम नमूद करावा आणि त्यानंतरचं जनगणना करावी

दरम्यान, या नोटीसला उमेश सिंगनजुडे यांनी उत्तर दिलं असून, ओबीसींचा कॉलम नमूद करावा आणि त्यानंतरचं जनगणना करावी, अशी मागणी केली आहे. लाखनी नगरपंचायतनं अशा प्रकारची नोटीस बजावल्यानं ओबीसी बांधवांमध्ये प्रशासना विरोधात नाराजी पसरली आहे. याबाबत लाखनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी आशिष घोडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळलं. परिणामी या प्रकरणी आता नेमकं काय घडतं हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Amravati News : जनगणनेसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

जनगणनेसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रदीप गणोरकर (वय 50) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते वरूड तालुक्यातील करजगाव येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत कार्यरत होते. प्रदीप गणोरकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शिक्षक संघटनांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबाला न्याय व आर्थिक आधार मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

गणोरकर यांची करजगाव परिसरातच जनगणना प्रगणक म्हणून नियुक्ती झाली होती. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गणोरकर जनगणनेसाठी निघाले होते. मात्र, अचानक छातीत असह्य कळा येऊ लागल्याने ते घराकडे परतले. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पारडसिंगा मार्गावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.