शिक्षण चिंतन : निपुणताधारित शिक्षणाची गरज
esakal June 10, 2026 11:46 AM

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

शिक्षणाचा अंतिम उद्देश विद्यार्थ्यांना जीवनासाठी तयार करणे हा असतो. मात्र आजच्या शालेय शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले असता एक गंभीर विसंगती दिसून येते. दैनंदिन आयुष्यात यशस्वीपणे वावरण्यासाठी ज्या निपुणतांची आवश्यकता असते आणि शाळांमध्ये जे शिक्षण दिले जाते यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. परिणामी अनेक विद्यार्थी परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवतात, परंतु प्रत्यक्ष जीवनातील समस्यांचा सामना करताना त्यांना अडचणी येतात.

दैनंदिन व्यवहारातील प्रत्येक प्रश्न हा वेगळा असतो. कोणत्याही दोन परिस्थिती पूर्णपणे सारख्या नसतात. एखादी आर्थिक अडचण, आरोग्यविषयक निर्णय, व्यावसायिक समस्या किंवा सामाजिक संबंधांतील प्रश्न सोडविताना व्यक्तीला परिस्थितीचे विश्लेषण करावे लागते, उपलब्ध माहितीचा विचार करावा लागतो आणि अनेक पर्यायांमधून योग्य पर्याय निवडावा लागतो. एखादा निर्णय चुकीचा ठरला तरी दुसरा पर्याय उपलब्ध असतो. म्हणजेच वास्तव जीवनात प्रश्नांची उत्तरे अनेक असू शकतात आणि त्यांची योग्यताही परिस्थितीनुसार बदलू शकते.

शालेय परीक्षांमध्ये बहुतेक वेळा पाठ्यपुस्तकातील प्रश्नच विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे आधीच निश्चित असतात आणि अनेकदा एकच उत्तर ‘बरोबर’ मानले जाते. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन मुख्यतः स्मरणशक्तीच्या आधारे केले जाते. त्यामुळे विचारशक्ती, निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि समस्या सोडवणूक यासारख्या जीवनावश्यक निपुणतांचा पुरेसा विकास होत नाही.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रश्न हे एकात्मिक स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ, घरगुती बजेट तयार करताना गणित, अर्थशास्त्र, संवादकौशल्य, नियोजन आणि निर्णयक्षमता या सर्वांचा एकत्रित वापर करावा लागतो. पर्यावरणाशी संबंधित एखादा प्रश्न समजून घेण्यासाठी विज्ञान, समाजशास्त्र, भूगोल आणि नैतिक मूल्ये यांचा परस्परसंबंध लक्षात घ्यावा लागतो. वास्तविक जीवनात विषयांच्या सीमा अस्तित्वात नसतात.

शालेय शिक्षणामध्ये ज्ञानाचे विभाजन स्वतंत्र विषयांमध्ये केलेले असते. गणित, विज्ञान, भाषा, समाजशास्त्र हे विषय वेगवेगळे शिकवले जातात. प्रत्येक विषयातील ज्ञान स्वतंत्रपणे आत्मसात केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञान एकत्र करून प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर लागू करण्याची सवय लागत नाही. ज्ञानाचे तुकडे मिळतात, परंतु त्यांचे एकत्रीकरण करण्याची क्षमता विकसित होत नाही.

दैनंदिन व्यवहारात इतरांची मदत घेणे हे दुर्बलतेचे लक्षण मानले जात नाही. आजच्या जगात संघभावना, सहकार्य आणि सामूहिक समस्या सोडवणूक यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. शालेय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याची अपेक्षा असते. परीक्षेदरम्यान चर्चा करणे, सहकाऱ्यांची मदत घेणे किंवा सामूहिकरीत्या उत्तर शोधणे हे गैरप्रकार मानले जातात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, संवाद आणि गटकार्याची कौशल्ये विकसित होण्याऐवजी स्पर्धेची मानसिकता अधिक दृढ होते. वास्तविक जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सहकार्याची वृत्ती त्यामुळे मागे पडते.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाने याच समस्येकडे लक्ष वेधले आहे. शिक्षण केवळ माहिती देणारे न राहता निपुणताधारित असावे, अशी भूमिका त्यामध्ये मांडली आहे. विद्यार्थ्यांनी शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितींमध्ये वापरता यावे, समस्या सोडविता याव्यात, चिकित्सक विचार करता यावा, सर्जनशील उपाय शोधता यावेत आणि इतरांसोबत प्रभावीपणे काम करता यावे, यावर भर दिला आहे. शालेय शिक्षण आणि वास्तविक जीवन यातील दरी कमी करण्यासाठी निपुणताधारित शिक्षणाचा स्वीकार ही काळाची गरज आहे. शिक्षणाचे खरे यश हे परीक्षेतील गुणांमध्ये नसून विद्यार्थ्याला जीवनातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता प्राप्त करून देण्यात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.