पुण्यातील सातत्याने अपघातांचे केंद्र ठरणाऱ्या नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री आणखी एका भीषण अपघाताची नोंद झाली. एक भरधाव सिमेंट मिक्सर पलटी होऊन थेट दुचाकीवर कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एका ३१ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच चिरडून मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वाराला पळण्याची किंवा बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. रामेश्वर मच्छिंद्र भोगले (३१) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या घटनेमुळे कात्रज आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
मध्यरात्री साडेबारा वाजता घडली दुर्घटनानऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ जून २०२६ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास नवले ब्रिजजवळील पल्स हॉस्पिटलसमोर घडली. गोरख लक्ष्मण रनसुरे (५०) हा चालक त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा सिमेंट मिक्सर (एमएच १२ आरएन २८६६) घेऊन कात्रजकडून बावधनच्या दिशेने जात होता. सिमेंट मिक्सर नवले चौक परिसरात आला असता एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
वाहन वेगात असल्याने हा अवजड मिक्सर थेट रस्त्यावर पलटी झाला. दुर्दैवाने, त्याच वेळी शेजारून आपली होंडा शाईन ही दुचाकी येत होते. बाईक घेऊन बावधनच्या दिशेने जाणारे रामेश्वर भोगले हे या मिक्सरखाली पूर्णपणे दबले गेले. जड वाहनाखाली चिरडले गेल्याने रामेश्वर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर कात्रज-देहूरोड बायपासवर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापतयानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. या अपघातात मिक्सर चालक गोरख रनसुरे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत रामेश्वर भोगले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तसेच याप्रकरणी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निष्काळजीपणे, मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आणि भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला जाणार आहे. नऱ्हे पोलीस ठाण्यात ही प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नऱ्हे पोलीस करत आहेत.