4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये 'ही' लोकप्रिय अभिनेत्री साकारणार लंकेची महाराणी; रुपवान अप्सरा रावणाची पत्नी झाली अन्...
abp majha web team June 10, 2026 02:13 PM

Ramayan Film Mandodari Actress: रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपट अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. तर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी झळकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटात कोणत्या भूमिकेत कोण झळकणार, याची एकच चर्चा सुरू होती. या  चित्रपटात अभिनेत्री काजल अग्रवालला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. रामायणमध्ये ती रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारत आहे. काजल अग्रवालने या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या दमदार टीझरमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत, तर अभिनेत यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे. आता या भव्य चित्रपटात 'मंदोदरी'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव समोर आलंय. 'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवाल या चित्रपटात लंकेची महाराणी अन् रावणाच्या पत्नीची मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाच्या निर्मितीबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. 'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत, काजल अग्रवालने 'रामायण'वर काम करण्याचा अनुभव तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील इतर सर्व प्रकल्पांपेक्षा वेगळा आणि खास ठरल्याचं सांगितलं.

काजल अग्रवाल 'रामायण'बद्दल म्हणाली ..

चित्रपटाविषयी बोलताना काजल म्हणाली की, या चित्रपटाच्या निर्मितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे आणि संपूर्ण टीमसाठी हा प्रकल्प भावनिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे. ती म्हणाली, "हा पूर्णपणे वेगळा अनुभव होता. या चित्रपटात अप्रतिम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतात याआधी अशा प्रकारचा चित्रपट कधीच बनलेला नाही. कलाकार म्हणून आम्हीही प्रथमच असा अनुभव घेत आहोत. ही आपल्या देशाची कथा असल्यामुळे ती आमच्या मनाच्या खूप जवळची आहे."

 कोण होती लंकेची महाराणी मंदोदरी?

रामायणातील मंदोदरी ही केवळ रावणाची पत्नी म्हणून ओळखली जात नाही, तर ती बुद्धिमान, दूरदर्शी आणि धर्मनिष्ठ स्त्री म्हणूनही स्मरणात राहते. तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती अनेक कथा आणि आख्यायिका विणल्या गेल्या आहेत. मंदोदरी  नाव घेताच सर्वप्रथम रावणाची आठवण येते. सीतेचे अपहरण करून तिला लंकेत आणलेल्या रावणाला वारंवार योग्य सल्ला देणारी पत्नी म्हणजे मंदोदरी. तिने रावणाला सीतेला श्रीरामांकडे परत पाठवण्याचा आणि विनाश टाळण्याचा सल्ला दिला होता. तिच्या मते, श्रीराम हे केवळ अयोध्येचे राजा नसून संपूर्ण विश्वाचे अधिपती आणि परमब्रह्म होते. त्यामुळे त्यांच्याशी वैर सोडण्याची विनंती तिने रावणाकडे केली होती. परंतु अहंकाराने आंधळ्या झालेल्या रावणाने तिचा सल्ला नाकारलेला.

मंदोदरीच्या जन्माविषयीही विविध कथा प्रचलित आहेत. बहुतेक कथांनुसार ती असुरांचा प्रसिद्ध वास्तुकार मयासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या होती. त्यामुळे तिच्यात सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा सुंदर संगम होता. मंदोदरीच्या जन्माविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. एका कथेनुसार, ती प्रथम अप्सरा होती, त्यानंतर बेडकी, मग कुणाच्याही मालकीची नसलेली ही मुलगी पुढे राजकन्या बनली. दत्तक आई-वडिलांनी तिचे संगोपन अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने केले. राजवाड्यात वाढलेल्या मंदोदरीच्या सेवेसाठी शेकडो दासी होत्या आणि ती नेहमी उत्कृष्ट रेशमी वस्त्रे व मौल्यवान दागिने परिधान करत असे. केवळ सौंदर्यच नव्हे तर शिक्षण आणि कौशल्यांमध्येही ती प्रवीण होती. तिने धनुर्विद्येचे सखोल प्रशिक्षण घेतले होते. तसेच, महान वास्तुशिल्पकार असलेल्या तिच्या वडिलांकडून तिने राजवाडे आणि भव्य इमारती उभारण्याचे शास्त्रही शिकले. त्यामुळे मंदोदरी ही केवळ लंकेची राणी नव्हे, तर बुद्धिमान, कुशल आणि बहुगुणी स्त्री म्हणूनही ओळखली जाते.रामायणातील स्त्री पात्रांमध्ये मंदोदरीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ती पतीनिष्ठ असली तरी अन्यायाचे समर्थन करणारी नव्हती. योग्य-अयोग्य यातील फरक ओळखून सत्याची बाजू घेण्याचे धैर्य तिच्यात होते.

'रामायण'चं बजेट किती?

रामायण'च्या दोन्ही भागांच्या निर्मितीसाठी सुमारे 4000 कोटी रुपयांचा खर्च लागल्आयाचं सांगितलं जातं. या बजेटमुळे हा चित्रपट जगातील सर्वाधिक खर्चिक चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकतो. चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा यांचे म्हणणे आहे की, 'द लॉर्ड ऑफ द रिंग्स' आणि 'अवतार'सारख्या हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देण्याच्या उद्देशाने हा चित्रपट तयार केला जात आहे, जेणेकरून त्याला जागतिक स्तरावरही पसंती मिळेल. चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित केला जाणार आहे. 'रामायण'चा पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.