Jitendra Awhad On Me Savitribai Jyotirao Phule Marathi Serial: स्टार प्रवाहवरची (Star Pravah) मालिका 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Mi Savitribai Jotirao Phule) ही मालिका काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका सुरू होऊन अवघे पाचच महिने उलटलेत, तरीसुद्धा मालिका टीआरपीच्या कारणास्तव निरोप घेत आहे. मालिकेत प्रमुख भूमिका करणारे अभिनेते अमोल कोल्हे (Actor Amol Kolhe) यांची मालिका वाचवण्यासाठी खूप धडपड सुरूये, तसेच, मालिका पुन्हा सुरू होणार असा निर्धार त्यांनी केलाय. 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, असा निर्धार लोकसभा खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेसाठी 50 लाखांचा निधी दिलाय. तर, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मालिकेसाठी 10 लाखांची देणगी दिलीय.
आमदार जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? (Jitendra Awhad On Mi Savitribai Jotirao Phule Marathi Serial)
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिका बंद झाली, बंद करण्यात आली... 2014 सालापासून जेव्हा मोदी सरकार आलं, तेव्हापासून विचारांचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम मोदी सरकार सातत्यानं करतंय..." पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हेंना उद्देशून म्हणाले की, "जेव्हा तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका स्विकारली, तेव्हा त्याला सर्वात आधी विरोध करणारा मी होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. त्यावेळी मला शरद पवार साहेबही ओरडले होते की, अशी विरोधी भूमिका तू घ्यायला नको होती... पण मी एकदा घेतलेली भूमिका कधीही मागे घेत नाही. तुमच्या नथुरामाच्या भूमिकेला माझा विरोध होता आणि राहील... पण, 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' मालिकेसाठी मी 10 लाखांची देणगी जाहीर करतोय..."
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणालेले? (Amol Kolhe On Mi Savitribai Jotirao Phule Marathi Serial)
अमोल कोल्हे म्हणाले की, "खंत मात्र एका गोष्टीची व्यक्त करतो की, 2017 मध्ये राजकारणात आलो नव्हतो, त्यावेळी चुकीनं केलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेसाठी बाह्या सरसावून रोखणारे हात, ज्योतिराव फुलेंची भूमिका करतो, म्हणून शाबासकी द्यायला पुढे येताना दिसले नाहीत... याची खंत मात्र मनात कायम राहील... पण त्याचवेळी हीसुद्धा गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो की, मी सुरुवातीला म्हणालो की, महाराष्ट्र धर्म लढायचं सांगतो, रडायचं नाही... 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात... मला आता माहीत नाही, कोणत्या माध्यमात, कोणत्या वाहिनीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर... पण त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार...कारण ही बांधिलकी आहे... मला माध्यमा माहीत नाही, पैसा कसा उभा राहणार मला काहीच माहीत नाही... मला फक्त एवढंच माहितीय, जर हा देश वाचवायचा असेल, तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय...आणि हा महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल, तर त्याची वैचारिक बैठक मजबूत करण्याचं काम मला पुन्हा एकदा करावं लागेल, त्यामध्ये खारीचा वाटा का होईना, या माध्यमातून उचलला जात असेल, तर माझी तयारी आहे..."
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले...' मालिका का बंद होतेय?
स्टार प्रवाहवरची 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका अवघ्या पाच महिन्यात ऑफ एअर झाल्यानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. येत्या तीन महिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनी नव्या आठ मालिका आणणार आहे. त्यामुळे अवघ्या 152 भागांमध्येच अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असणारी 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका गुंडाळण्यात आली. 14 जूनला ही मालिका बंद होईल. पण, आता अमोल कोल्हेंनी काहीही झालं तरी मालिका सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. ज्या आठवड्यात मालिका बंद होणार, त्याच आठवड्यात पुन्हा मालिका सुरू करण्याचा निर्धार अमोल कोल्हेंनी केलाय.